पुणे,
Parli murder case परळी शहराजवळील वरवटी शिवारात पैशांच्या किरकोळ वादातून दारूच्या नशेत ३६ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांनी मृतदेह ओढून रुळाबाहेर नेल्यामुळे आरोपींचा डाव फसला आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने केवळ ४८ तासांत तपास पूर्ण करून मृताच्या दोन जिवलग मित्रांना अटक केली आहे. अफझल उर्फ तौहिद खान कैराती खान असे मृत तरुणाचे नाव असून, ऋषिकेश परमेश्वर फड (वय २७, रा. सोमेश्वरनगर, परळी) आणि गौरव दीपक व्यास (वय २६, रा. स्नेहनगर, परळी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी तिघेही ऋषिकेशच्या कारमधून वरवटी शिवारात गेले होते. दिवसभर दारूचे सेवन केल्यानंतर रात्री पुन्हा पार्टीदरम्यान पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. वाद चिघळत गेल्यानंतर ऋषिकेश आणि गौरव यांनी बाजूला पडलेला मोठा दगड उचलून तौहिदच्या डोक्यात वार केला. गंभीर जखमी झालेल्या तौहिदचा नंतर झालेल्या मारहाणीत जागीच मृत्यू झाला.घटनेनंतर आरोपी घाबरलेल्या अवस्थेत मृतदेहाजवळच थांबून राहिले आणि रात्री उशिरापर्यंत परिसरातच थांबले होते. Parli murder case त्यानंतर त्यांनी मृतदेह कारमध्ये टाकून लेंढेवाडी शिवारातील रेल्वे रुळावर नेऊन ठेवला. तौहिदने आत्महत्या केल्याचा आभास निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, आरोपी निघून गेल्यानंतर मोकाट कुत्र्यांनी मृतदेह रुळाबाहेर ओढल्यामुळे हा बनाव उघडकीस आला.
१ जून रोजी सकाळी स्थानिक नागरिकांना रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली आणि दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असला तरी पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.