प्रशासनाची मोठी कारवाई पाच जिल्ह्यांत १४ ठिकाणी छापे

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
पुणे
FDA raids अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भेसळीच्या संशयावरून पुणे विभागात मोठी कारवाई करत पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत १४ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत सुमारे ३१ लाख ७३ हजार रुपयांचा प्रतिबंधित आणि संशयित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 

FDA raids 
पान, गुटखा, दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन, कडधान्य, मैदा, बेसन तसेच इतर अन्नपदार्थांचा मोठा साठा या छाप्यांमध्ये जप्त करण्यात आला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि बेकायदेशीररीत्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची साठवणूक व विक्री करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातही स्वतंत्रपणे पाच ठिकाणी छापे टाकून सुमारे १९ लाख रुपयांचा भेसळयुक्त व प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे एका गोदामावर कारवाई करत गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला, तर दुसऱ्या एका दुकानातून भेसळयुक्त मैदा, बेसन आणि आटा असा सुमारे दहा लाखांहून अधिक रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.खेड तालुक्यातील खालची FDA raids  भांबुरवाडी येथे विनापरवाना सुरू असलेल्या सुपारी कारखान्यावर छापा टाकून सुमारे आठ लाख रुपयांची सुपारी जप्त करण्यात आली. तसेच नरे परिसरातील एका फरसाण दुकानात हिरव्या वाटाण्यात हानिकारक कृत्रिम रंगांचा वापर केल्याचे उघडकीस आले असून त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
 
 
या संपूर्ण कारवाईदरम्यान विविध अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकांनी सहभाग घेतला. सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली असून अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी तपासणी करून नमुने जप्त केले. जप्त केलेल्या पदार्थांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध अशा मोहिमा पुढेही सुरू राहणार आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या संशयित बाबी आढळल्यास टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.