मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावरून संघर्षाची ठिणगी

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
पुणे
Pune Municipal Corporation पुणे महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावर राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी नेमण्यात आल्याने महापालिकेत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेतील सेवाज्येष्ठता डावलून बाहेरील अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याचा आरोप करत प्रशासनात अंतर्गत संघर्षाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 

Pune Municipal Corporation  
राज्य सरकारच्या वित्त विभागाने २९ मे रोजी आदेश काढत शासनाच्या वित्त विभागातील अधिकारी भगवान दत्तात्रय घाडगे यांची पुणे महानगरपालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी या रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली आहे. या निर्णयानंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या पदावर महापालिकेतीलच अधिकाऱ्याला संधी मिळायला हवी होती, अशी भूमिका पुढे येत आहे.महापालिकेत गेल्या १५ वर्षांपासून उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. कुणाल मंडवाले यांनी या नियुक्तीला विरोध दर्शवत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र पाठवले आहे. या पदावर सेवाज्येष्ठतेनुसार आपला हक्क असल्याचा दावा करत, बाहेरील अधिकाऱ्याला रुजू करून घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच पदोन्नती न मिळाल्यास मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या निर्णयामुळेPune Municipal Corporation  महापालिकेच्या वित्त विभागात “आतील अधिकारी विरुद्ध प्रतिनियुक्तीवरील अधिकारी” असा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीही राज्य सरकारकडून महापालिकेत उपायुक्त, सहाय्यक आयुक्त अशा पदांवर प्रतिनियुक्तीने अधिकाऱ्यांची नियुक्ती होत असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवर परिणाम होत असल्याचा आरोप केला जात आहे.महापालिका सेवेत दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी वाढत असल्याचे चित्र असून प्रतिनियुक्तीच्या या धोरणावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणावर महापालिका आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे प्रशासनातील सर्वांचे लक्ष लागले आहे.