पुणे,
water crisis शहरातील नागरिकांसाठी पावसाळ्याच्या तोंडावर चिंताजनक चित्र समोर आले आहे. यंदा हवामान विभागाने सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवल्याने आणि पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांतील साठा घटल्याने शहरात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख स्रोतांपैकी एक असलेल्या खडकवासला धरणात सध्या केवळ सुमारे साडेपाच टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. उपलब्ध साठा कोणतीही कपात न करता वापरल्यास तो जुलै अखेरपर्यंतच पुरेल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने बैठक घेतली असून, संभाव्य पाणीकपातीच्या विविध पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना सादर केला water crisis असून त्याचे वेळापत्रकही तयार ठेवण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजते.पुणे शहराला दरमहा मोठ्या प्रमाणात पाणी लागते, तर पुढील तीन महिन्यांसाठी आवश्यक असलेला साठा आणि सध्याची उपलब्धता यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. बाष्पीभवन आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची अतिरिक्त गरज लक्षात घेता सध्याचा साठा अपुरा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.दरम्यान, कमी पावसाच्या अंदाजामुळे आणि मान्सूनच्या संभाव्य विलंबामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे पाण्याचा साठा जपण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यास नागरिकांना पाणी वापरात काटकसर करावी लागणार आहे.