‘खोटे आरोप करणे अत्यंत लज्जास्पद’

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
मुंबई
Hina Khan अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने ‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेच्या निर्मात्यांवर केलेले लैंगिक शोषणाचे आरोप खोटे असल्याची कबुली दिल्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. जवळपास दहा वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून अभिनेत्री हिना खाननेही शिल्पावर कठोर शब्दांत टीका केली आहे.
 
 

Hina Khan  
दहा वर्षांपूर्वी शिल्पा शिंदेने ‘भाभीजी घर पर हैं’ ही लोकप्रिय मालिका सोडताना निर्माते संजय कोहली यांच्यावर लैंगिक शोषण आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले होते. त्या वेळी या आरोपांमुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली होती. मात्र अलीकडेच कॉमेडियन भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये बोलताना शिल्पाने हे आरोप खोटे असल्याचे सांगितले. या खुलाशानंतर सोशल मीडियावर आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.या पार्श्वभूमीवर अभिनेत्री हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. तिने म्हटले की, सामान्यतः ज्या प्रकरणांशी आपला थेट संबंध नसतो त्यावर भाष्य करणे ती टाळते. मात्र या प्रकरणात बोलणे आवश्यक वाटत असल्याचे तिने नमूद केले. हिनाच्या मते, या प्रकरणात एका पुरुषाची प्रतिमा आणि त्याच्या कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. संबंधित निर्मात्याचे कुटुंब, पत्नी आणि इतर महिला सदस्य यांच्यावरही या आरोपांचा परिणाम Hina Khan झाला असे तिने म्हटले.हिनाने पुढे लिहिले की, एखादी लढाई जिंकण्यासाठी किंवा स्वतःची बाजू मजबूत करण्यासाठी दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने गंभीर स्वरूपाचे आरोप करणे अत्यंत लज्जास्पद आहे. अशा प्रकारे एखाद्याची बदनामी करणे चुकीचे असून अशा प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज असल्याचे तिने नमूद केले. त्याचवेळी, जर एखाद्या व्यक्तीसोबत खरोखर अन्याय किंवा अत्याचार झाला असेल, तर त्या व्यक्तीला न्याय मागण्याचा आणि आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही तिने स्पष्ट केले.
 
 
 
अभिनेत्री पूजा बेदीची नाराजी 
 
 
 
दरम्यान, शिल्पा शिंदेच्या Hina Khan कबुलीनंतर अभिनेत्री पूजा बेदीनेही नाराजी व्यक्त केली आहे. खोट्या आरोपांमुळे लैंगिक शोषणाच्या खऱ्या पीडितांचे नुकसान होते आणि अशा घटनांमुळे न्यायव्यवस्थेवरील तसेच तक्रारींच्या विश्वासार्हतेवरील विश्वास कमी होऊ शकतो, असे मत तिने व्यक्त केले. कायद्याचा गैरवापर टाळण्याची गरज असल्याचेही तिने अधोरेखित केले.
अभिनेता करण ओबेरॉय यानेदेखील या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. शिल्पा शिंदेच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात खोटे आरोप, त्यांचे परिणाम आणि न्यायप्रक्रियेतील जबाबदारी यांवर चर्चा सुरू झाली असून या वादाकडे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीचे लक्ष लागले आहे.