मुंबई,
stay away from the coast मुंबईत मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागत असतानाच समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा जारी करण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अरबी समुद्रात तब्बल २४ वेळा मोठी भरती येणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या काळात समुद्रातील लाटांची उंची साडेचार मीटरपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून महिन्यात सहा वेळा मोठी भरती येणार असून जुलै महिन्यातही सहा वेळा समुद्र खवळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, १६ जुलै रोजी यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक उंच भरती नोंदवली जाऊ शकते. त्या दिवशी समुद्रातील लाटांची उंची जवळपास ४.९ मीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.ऑगस्ट महिन्यात पाच तर सप्टेंबरमध्ये सात वेळा मोठ्या भरतीचा इशारा देण्यात आला आहे. भरतीच्या काळात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची साथ मिळाल्यास समुद्र अधिक धोकादायक होऊ शकतो. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी किंवा छायाचित्रणासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महानगरपालिका प्रशासनाने भरतीच्या दिवसांमध्ये समुद्रकिनाऱ्यांजवळ गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः चौपाट्या, समुद्रकिनारे, खडकाळ भाग आणि किनारी रस्त्यांवर जाणाऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे. भरतीच्या काळात समुद्राच्या लाटा अचानक उंच उसळू शकतात, त्यामुळे कोणताही धोका पत्करू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.दरम्यान, मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र पावसाळ्यात समुद्रकिनारी सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.