दुपारीच अंधारले दिल्लीचे आकाश!

वादळी वाऱ्यांसह पावसाचा तडाखा

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Stormy Rain in Delhi राजधानी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात गुरुवारी दुपारनंतर हवामान अचानक बदलले. काळ्या ढगांनी आकाश व्यापल्यानंतर अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे तापमानात घट झाली असून नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर वादळी वाऱ्यांसह पावसाची सुरुवात झाली. हवामान विभागाने दिल्ली आणि आसपासच्या परिसरासाठी सतर्कतेचा इशारा जारी केला असून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः कमी उंचीच्या भागांमध्ये पाणी साचण्याची आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 
 
Stormy Rain in Delhi
 
दरम्यान, यंदाच्या मान्सूनबाबत हवामान तज्ज्ञांचे लक्षही केंद्रित झाले आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अंदाजानुसार देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामानातील जागतिक बदल आणि प्रशांत महासागरातील हवामान चक्राचा प्रभाव भारतीय मान्सूनवर पडू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः एल निनो परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. एल निनोचा प्रभाव वाढल्यास देशातील अनेक भागांतील पर्जन्यमानावर परिणाम होऊ शकतो. जून महिन्यात त्याचा प्रभाव मर्यादित राहण्याची शक्यता असली तरी पुढील काही महिन्यांत त्याची तीव्रता वाढू शकते, असा अंदाज आहे. याच दरम्यान नैऋत्य मान्सूनने केरळ किनारपट्टीवर प्रवेश केल्याने देशातील पावसाळी हंगामाला अधिकृत सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत मान्सूनच्या प्रगतीचा वेग आणि त्याचा विविध राज्यांवरील परिणाम याकडे शेतकरी, हवामान तज्ज्ञ आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.