नवी दिल्ली,
Strength of the Indian Navy भारतीय नौदलाच्या ताफ्यात या महिन्यात पाच स्वदेशी युद्धनौकांचा समावेश होणार असून देशाची सागरी सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. ‘मेड इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार झालेल्या या जहाजांमध्ये दोन स्टेल्थ फ्रिगेट्स, एक सर्वेक्षण जहाज आणि दोन पाणबुडीविरोधी लढाऊ नौकांचा समावेश आहे.गार्डन रीच शिपबिल्डर्स, कोचीन शिपयार्ड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स यांनी तयार केलेल्या या आधुनिक युद्धनौकांमुळे भारताची स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमता अधिक स्पष्ट होते. या जहाजांमध्ये अत्याधुनिक सेन्सर्स, क्षेपणास्त्र प्रणाली आणि आधुनिक युद्धतंत्रज्ञानाचा समावेश आहे.

नव्या फ्रिगेट्समध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि बराक-8 हवाई संरक्षण प्रणालीसारखी शस्त्रास्त्रे बसवण्यात आली असून समुद्री युद्धात त्यांची क्षमता मोठी मानली जाते. तर सर्वेक्षण जहाज समुद्रतळ नकाशे तयार करणे आणि सागरी माहिती गोळा करण्याचे काम करणार आहे.किनारी भागात तैनात करण्यात येणारी पाणबुडीविरोधी जहाजे शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांना निष्प्रभ करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. या समावेशामुळे हिंद महासागरातील भारताची सामरिक ताकद आणखी वाढणार आहे. भारतीय नौदल सध्या 130 हून अधिक जहाजे चालवत असून 2035 पर्यंत 200 युद्धनौका आणि पाणबुड्यांचा मजबूत ताफा उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.