तुर्कस्तानचा दुहेरी संदेश?

पाकिस्तानला पाठिंबा पण भारताशी सहकार्याचीही इच्छा

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
सिंगापूर,
Turkey's Double Message सिंगापूरमध्ये आयोजित एका आंतरराष्ट्रीय धोरणात्मक परिषदेत तुर्कस्तानचे परराष्ट्र मंत्री Hakan Fidan यांनी भारत आणि पाकिस्तानबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. पाकिस्तानसोबतचे तुर्कस्तानचे संबंध दृढ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, मात्र त्याचवेळी भारतासोबतही सकारात्मक आणि मजबूत संबंध निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली.परिषदेदरम्यान बोलताना फिदान यांनी सांगितले की, पाकिस्तानसोबतच्या तुर्कस्तानच्या मैत्रीमुळे भारताने नाराज होण्याचे कारण नाही. विविध देशांशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर सहकार्य आणि मतभेद असू शकतात, परंतु त्यामुळे इतर द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होऊ नये, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, काही ऐतिहासिक आणि धोरणात्मक कारणांमुळे पाकिस्तानसोबत तुर्कस्तानचे घनिष्ठ संबंध आहेत, परंतु त्याचा अर्थ भारताविरोधी भूमिका असा होत नाही.
 
 
तुर्कस्तान
 
फिदान यांनी पुढे सांगितले की, भारत आणि तुर्कस्तान यांच्यात कोणताही सीमावाद नाही, तसेच दोन्ही देशांमध्ये कटु ऐतिहासिक पार्श्वभूमीही नाही. त्यामुळे परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी दोन्ही देशांकडे अनेक संधी उपलब्ध आहेत. आर्थिक, व्यापार, तंत्रज्ञान आणि जागतिक विषयांवर दोन्ही देशांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.दरम्यान, अलीकडील काळात भारत आणि तुर्कस्तान यांच्यातील संबंधांमध्ये काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. विशेषतः भारताने दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईवर तुर्कस्तानने व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे दोन्ही देशांतील राजनैतिक वातावरण चर्चेत आले होते. त्यानंतर काही अधिकृत कार्यक्रमांमध्ये भारताकडून मर्यादित सहभाग दिसून आल्याने या संबंधांबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. तथापि, तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या ताज्या वक्तव्यामुळे अंकारा भारतासोबतचे संबंध सुधारण्यास उत्सुक असल्याचे संकेत मिळत आहेत. पाकिस्तानशी असलेली मैत्री कायम ठेवत भारताशीही सकारात्मक संवाद आणि सहकार्य वाढविण्याचा तुर्कस्तानचा प्रयत्न असल्याचे या विधानातून स्पष्ट होत आहे.