मुंबई,
ubatha-faction : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी संघटनात्मक कारवाई केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी पक्षाने तीन नेत्यांची हकालपट्टी जाहीर केली. पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
विधान परिषद निवडणुकीत अनेक इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने विविध पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला या नाराजीचा सर्वाधिक फटका महायुतीला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, महायुतीने बहुतांश नाराज नेत्यांची समजूत काढण्यात यश मिळवले असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना (उबाठा) पक्षाने रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघातून बाळ माने यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. तसेच छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेल्या देवयानी डोनगावकर यांनीही अर्ज मागे घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यासोबतच कृष्णा डोनगावकर यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात जाऊन निवडणूक प्रक्रियेत निर्णय घेतल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी उमेदवारी मागे घेण्यामागे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे विधान परिषद निवडणुकीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.