* काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांची धक्कादायक माघार
* अपक्ष सुधीरचंद कोठारी यांचेही नामांकन मागे
* काँग्रेसचे मतदार विकले गेल्याचा अग्रवाल यांचा आरोप
* वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
चंद्रपूर,
vidhan parishad nivadanuk वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण लखानी यांची विधान परिषदेसाठी अविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अधिकृत उमदेवार शैलेश अग्रवाल यांनी, गुरूवार, 4 जून रोजी दुपारी अचानपणे आपली उमदेवारी मागे घेतली. सोबतच अपक्ष उमदेवार सुधीरचंद कोठारी यांनीही निवडणुकीतून माघार घेतल्याने लखानी यांचा विजय सूकर झाला.
vidhan parishad nivadanuk निवडणुकीच्या रिंगणात आता अरूण लखानी एकटेच उरले असल्याने त्यांची या मतदार संघातून विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. अरूण लखानी हे सुप्रसिध्द उद्योजक तसेच श्री. नरकेसरी प्रकाशन लिमिटेडचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्या या विजयाने भाजपात जल्लोष साजरा होत आहे. आमचे मतदार आधीच विकले गेले होते. माझ्या नामांकनानंतरही ते भाजपाकडे जातच होते. आमच्या काही स्थानिक नेत्यांनीही भाजपाला मदत केली. त्यामुळे आता या निवडणुकीला काही अर्थ नाही आणि म्हणून मी माघार घेत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी लावला. त्यांनी उमदेवारी मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी म्हणजे गुरूवारी, दिड वाजताच्या सुमारास आपले नामांकन मागे घेतले. त्यांना काँग्रेसच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळत नसल्याची कुणकुण होतीच. निवडणूक जाहीर होण्याआधीच काँगे्रसचे मतदार भाजपाच्या गळाला लागल्याचा आरोप काँगे्रसचे विधीमंडळ गटनेता तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी केला होता.
संख्याबळ उरले नाही, घोडबाजाराला वाव होताः अग्रवाल
vidhan parishad nivadanuk आमच्याकडे संख्याबळ उरले नव्हते. संख्याबळ जुळवायची आमची तयार होती. पण गरीब आदिवासी भागातले जास्तीत जास्त मतदार आधीच भाजपाकडे चालले गेले. मी नामांकन सादर केल्यानंतर अजून काही नगरसेवक निघून गेले. पैशाच्या आमिषाला गरीब लोक बळी पडतात. आमच्याकडे दुसरा काही पर्याय शिल्लक राहिला नाही. जर मी निवडणूक लढवली असती, तर घोडेबाजाराला आणखी वाव मिळाला असता. पैशाच्या बरबादीशिवाय दुसरे काही हाती लागणार नव्हते आणि म्हणून मी निवडणुकीतून माघार घेतली, असे स्पष्टीकरण शैलेश अग्रवाल यांनी दिले. नाव घेणे योग्य नाही, पण मी संबंधित नेत्यांशी चर्चा करूनच निणर्य घेतल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व त्यांच्या परिसरातील मतदार रोखू शकले नसल्याची खंत अग्रवाल यांच्या मनात होती.