निवडणूक कामात दिरंगाई; १३ कर्मचाऱ्यांवर कारवाई

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
जळगाव,
voter-list-special-review-campaign : मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेतील कामकाजात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत जळगाव शहरातील शिक्षक, लिपिक आणि महापालिका कर्मचाऱ्यांसह १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे निवडणूक प्रक्रियेशी संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, निवडणूक आयोगाच्या कामकाजाकडे दुर्लक्ष केल्यास कठोर कारवाई होऊ शकते, असा संदेश प्रशासनाने दिला आहे.
 
 
jalgav
 
 
 
या प्रकरणी निवडणूक नायब तहसीलदार नवीनचंद्र अशोक भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहीम राबविण्यात येत होती. या मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नोंदींचे मॅपिंग, अस्पष्ट छायाचित्रांची दुरुस्ती तसेच इतर प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली होती.
 
प्रशासनाच्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर २०२५ पासून संबंधित कर्मचाऱ्यांना वेळोवेळी लेखी आणि तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. याशिवाय विविध आढावा बैठका, पत्रव्यवहार आणि सूचनांद्वारे कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, वारंवार सूचना मिळूनही काही कर्मचाऱ्यांनी सोपविलेली कामे वेळेत पूर्ण केली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
 
या दिरंगाईमुळे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. मतदार यादीचे पुनर्निरीक्षण हे निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे काम मानले जाते. त्यामुळे या कामात अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने प्रशासनाने संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
 
या प्रकरणी लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० च्या कलम ३२ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विविध शाळांतील शिक्षक, शासकीय कार्यालयांतील लिपिक आणि महापालिकेचे कर्मचारी यांचा समावेश आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, तपासानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.