काँग्रेसचे निवेदन : चौकशीचीही केली मागणी
यवतमाळ,
yavatmal vidhan parishad यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ विधान परिषद निवडणूक बिनविरोध न करता नोटा या पर्यायाबरोबर करावी. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागे दबाव, प्रलोभन अथवा आर्थिक देवाणघेवाण झाल्याची गंभीर शंका असून या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व उच्चस्तर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे काँग्रेसने निवेदनाद्वारे केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांच्या नेतृत्वात याबाबत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष आरिजबेग मिर्झा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र मोघे हे पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे, या निवडणुकीत महाविकास आघाडीचे, म्हणजेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची बाब समोर आली आहे. मात्र उमेदवारी अर्ज माघारीमागे राजकीय दबाव, आर्थिक प्रलोभन, प्रभाव अथवा इतर कोणताही अनुचित हस्तक्षेप झाला असण्याची गंभीर शंका मतदारांमध्ये व सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झाली आहे. लोकशाही व्यवस्थेत निवडणूक ही मुक्त, नि:पक्ष व पारदर्शक वातावरणात होणे अपेक्षित आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी उमेदवारांनी कोणत्याही दबाव, धमकी, आर्थिक व्यवहार अथवा प्रलोभनाशिवाय स्वतंत्र निर्णय घेणे हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
yavatmal vidhan parishad जर अशा प्रकारच्या कारणांमुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला असेल तर तो प्रकार लोकशाही प्रक्रियेवर आघात करणारा असून मतदारांच्या घटनात्मक अधिकारांवर परिणाम करणारा आहे. कांबळे यांनी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाशी कोणतीही चर्चा न करता, पक्षाला विश्वासात न घेता त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीतील मतदार म्हणून मतदारांना आपला प्रतिनिधी निवडण्याचा घटनात्मक व लोकशाही अधिकार आहे. कोणत्याही प्रकारच्या दबाव, आर्थिक व्यवहार अथवा तडजोडींमुळे निवडणूक बिनविरोध होत असल्यास मतदारांचा निवडीचा अधिकार हिरावला जातो. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागील संपूर्ण परिस्थितीची सक्षम तपास यंत्रणेमार्फत स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तर चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. अंतिम टप्प्यात केवळ एकच उमेदवार जरी शिल्लक राहिला तरी मतदारांना त्या उमेदवारास निवडण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार मिळावा यासाठी संबंधित उमेदवारासोबत नोटा हा पर्याय उपलब्ध करून द्यावा आणि मतदारांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी काँग्रेसच्या निवेदनातून करण्यात आली आहे.
तोंडावर पडल्यानंतरचे शहाणपण
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी आपल्या पक्षालाही विश्वासात न घेता किंवा कोणालाही न सांगता आपली उमेदवारी परत घेऊन टाकली. कांबळे यांच्या या धक्कादायक कृतीने तोंडावर पडलेल्या काँग्रेसने हा विश्वासघात आहे, आमच्या पाठीत त्यांनी खुपसलेला खंजीर आहे, अशा शब्दांत आपल्याच पक्षाच्या माणसाची संभावना करून त्यांच्या हकालपट्टीची जाहीर मागणी केली आहे. त्यांच्याच पक्षामुळे महाविकास आघाडीचीसुद्धा पंचाईत झाली असल्याचा मुद्दा सौम्य करण्यासाठी ‘नोटा’ पर्यायाची हास्यास्पद व असांसदीय मागणी करून आपली लाज सांभाळण्याचा ‘असा’ केविलवाणा प्रयत्न याच काँग्रेसला करावा लागत आहे.