अगादेज,
49 deaths in the Sahara Desert पश्चिम आफ्रिकेतील नायजर देशात सहारा वाळवंटात घडलेली एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेला एक ट्रक अचानक वाळवंटात बंद पडल्याने भीषण उष्णता आणि पाण्याच्या तीव्र अभावामुळे तब्बल 49 प्रवाशांचा तडफडून मृत्यू झाला, तर केवळ 2 जण सुदैवाने वाचले. ही घटना नायजरमधील अगादेज प्रांतात, अस्सामाका क्रॉसिंगपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर घडली. हे ठिकाण नायजर आणि अल्जीरिया यांच्या सीमेजवळ असून माली देशाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासमार्गावर आहे. हे सर्व प्रवासी एका धार्मिक कार्यक्रमासाठी माली येथे गेले होते आणि परतीच्या प्रवासात ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान ट्रक अचानक नादुरुस्त झाला. चालक आणि प्रवाशांनी वाहन दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. मर्यादित पाणी आणि अन्नसाठा संपल्यामुळे वाळवंटातील प्रचंड तापमानात ते सर्वजण अडकून पडले. आसपास मदतीची कोणतीही सोय नसल्याने परिस्थिती अत्यंत भीषण झाली आणि अखेर उष्णता व तहानेमुळे सर्वांचा मृत्यू झाला. प्रशासनाने मृतदेह सामूहिक दफनभूमीत दफन केल्याची माहिती दिली आहे. या दुर्घटनेत दोन प्रवासी मात्र कसेबसे बचावले. त्यांनी प्रचंड उष्णतेत तब्बल 50 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पायी पार करत पाण्याच्या स्रोतापर्यंत पोहोचून जीव वाचवला. त्यानंतर त्यांनी प्रशासनाला घटनेची माहिती दिली. हा मार्ग स्थलांतरित प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक मानला जातो आणि यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक जीवघेण्या घटना या परिसरात घडल्या असल्याचे सांगितले जात आहे.