विद्युत खांब कोसळले; ५ दिवसापासुन वीज गायब

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
आजनसरा, 
Ajanasara: Power Outage सोसाट्याच्या वादळाने टाकळी (निधा) शिवारात रविवार ३१ मे रोजी सायंकाळी ४ वाजता हाहाकार माजवला. या वादळात शेतातून गेलेल्या उच्चदाब विद्युत वाहिनीचे ५ खांब ट्रान्सफॉर्मरसह उन्मळून पडले. या घटनेत शेतकरी उमेश जौंजाळ, नामदेव जवंजाळ यांच्या शेतातील वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. पाच दिवसांपासून मोटरपंप बंद असल्याने शेतातील पिकं जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या घटनेची तक्रार विद्युत वितरण कंपनीच्या धोत्रा येथील कार्यालयात लेखी व तोंडी करण्यात आली. तरीही महावितरणच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी सुद्धा केलेली नाही. परिणामी, हजारो व्होल्टच्या जिवंत तारा शेतात लोंबकळत असून मोठा अपघात घडण्याची दाट शयता आहे.
 
 
vij
 
Ajanasara: Power Outage वादळाला ५ दिवस झाले. तेव्हापासून विहिरीत पाणी असूनही वीज नसल्याने एक थेंब देता आला नाही. ४५ अंशाच्या उन्हात पीक करपू लागलं. धोत्रा ऑफिसला रोज चकरा मारतो. पण, उद्या येतो, परवा येतो एवढंच उत्तर मिळत आहे. माझं लाखोंचं नुकसान झालं तर त्याला महावितरण जबाबदार असेल, असे शेतकरी जवंजाळ यांनी सांगितले, एकीकडे गावात पाण्याच्या दोन टाया असूनही पाणी नाही, दुसरीकडे शेतात वीज नाही. प्रशासक राज आणि महावितरणच्या कारभारामुळे टाकळीकर दुहेरी संकटात सापडले आहेत. तक्रार देऊन ५ दिवस उलटले तरी खांब उभा राहत नसेल तर ही यंत्रणा नेमकी कोणासाठी काम करते? असा संतप्त सवाल गावकरी विचारत आहेत. महावितरणने नवीन खांब उभारावे व वीज पुरवठा सुरू करावा. तसेच झालेल्या पीक नुकसानीची संपूर्ण भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे