पुणे,
Ambegaon ITI murder case पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगावजवळील गोनवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)च्या मुलांच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी पहाटे घडलेला हा प्रकार समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ संतोष साखरे (वय 23) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो आयटीआयच्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होता. उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे तो वसतिगृहाच्या टेरेसवर झोपला असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. याच ठिकाणी त्याची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमय भिका कोकरे (वय 19) याने पूर्वी झालेल्या भांडणाचा आणि वादाचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचा आरोप आहे. 4 जूनच्या रात्रीपासून 5 जूनच्या पहाटेच्या दरम्यान वसतिगृहात हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी ऋषिकेश लक्ष्मण बढेकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
आरोपीने सौरभ साखरे याच्यावर लोखंडी पाईप आणि सिमेंटच्या गट्ट्याने डोक्यात वार करून गंभीर मारहाण केल्याचेही फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे. या हल्ल्यात सौरभचा मृत्यू झाला. घटनेनंतर घोडेगाव पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हाAmbegaon ITI murder case नोंदवला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, या घटनेमागील नेमके कारण आणि घटनाक्रम उलगडण्याचे काम पोलीस करत आहेत. या घटनेमुळे आयटीआय परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.