अमरावती शहर बससेवा दारुण अवस्थेत निसर्ग संरक्षण संस्था व पर्यावरण विभागाचा अभ्यास

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
अमरावती, 
Amravati City Bus Service येथील निसर्ग संरक्षण संस्था आणि श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने अमरावती शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लेखाजोखा मांडणारा एक अभ्यास प्रकल्प नुकताच पूर्ण केला. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश एकघरे व पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एस. पी. इंगोले यांनी या अभ्यास प्रकल्पाचे ठळक निष्कर्ष आज जाहीर केले. या अभ्यासातून अमरावतीच्या शहर वाहतूक व्यवस्थेसंबंधी अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.
 
 
BUS
 
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कुठल्याही पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी प्रति एक लाख लोकसंख्येमागे किमान २० ते ४० बसेस असायला हव्यात त्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिके जवळ एक सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालवण्यासाठी निदान १५० ते २०० बसेस असायला पाहिजेत. सुमारे १० लाख लोकसंख्या असलेल्या व १२५ चौरस किलोमीटर विस्तार असलेल्या अमरावती महानगरपालिकेची स्थिती मात्र अत्यंत दारुण आहे. अमरावती शहरात सध्या फक्त ११ (अकरा) बसेस, केवळ सहा विविध मार्गांवर कशीबशी आपली सेवा देत आहेत. राज्यातल्या इतर सर्व मोठ्या शहरांमध्ये अमरावतीपेक्षा बसेसची संख्या कितीतरी जास्त आहे.
 
 
Amravati City Bus Service  सदैव आर्थिक विवंचनेत असलेली मनपा मात्र शहर बससेवा पुरवणार्‍या खाजगी ठेकेदाराकडून ५.२३ प्रती किमी या दराने रॉयल्टी वसुल करते. अमरावती शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडण्याचे हेच प्रमुख कारण आहे. शहराला प्रधानमंत्री योजने अंतर्गत ई-बसेस प्राप्त झालेल्या नाहीत. इतर प्रत्येक मोठ्या शहराने त्या मिळाल्या आहेत. शहराचा विस्तार बघता ३२ विविध मार्गांवर शहर बस सेवा सुरू होणे गरजेचे आहे. पुरेशा बसेस नसल्याने ऑटो रिक्षाचे प्रमाण वाढले आहे, त्याने प्रदुषणही होते. बस गाड्यांमधील अस्वच्छता हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आढळून आला. खाजगी वाहतूकदारांकडून रॉयल्टी न आकारता त्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान देऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे गरजेचे आहे. उच्च दर्जाच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी स्मार्ट, ए. आय. आधारित नियोजनाची गरज आहे. बस गाड्यांच्या शिस्तबद्ध वाहतुकीसाठी रियल टाईम मॉनिटरिंग सिस्टिम असत्यंत गरजेचे आहे. या अन्य काही सूचना या अभ्यासातून सूचविण्यात आल्या आहे. हा अभ्यास प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे यांचे सहकार्य लाभले. पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. मनिषा जाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अभ्यास प्रकल्पात प्रज्ञा मेश्राम, तेजल तायडे, नरसोबा गेडाम, राहुल पेंडोर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
निसर्ग संरक्षण संस्थेतर्फे डॉ निशिकांत काळे यांनी अभ्यास प्रकल्प प्रमुख म्हणून काम बघितले.