तामिळनाडूत अण्णामलाई यांचा अध्याय समाप्त

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Annamalai resigns in Tamil Nadu नवी दिल्ली येथे भाजपच्या अंतर्गत घडामोडींमध्ये मोठी घडामोड समोर आली आहे. तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी दिलेला राजीनामा पक्षाने अधिकृतपणे स्वीकारला आहे. काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याबाबत सुरू असलेली चर्चा आणि वरिष्ठ नेत्यांच्या समजूत काढण्याचे प्रयत्न अखेर संपुष्टात आले आहेत. अण्णामलाई यांनी अलीकडेच दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला होता. त्यानंतर त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र अखेर पक्षाने त्यांचा निर्णय मान्य करत राजीनामा स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 

Annamalai 
 
या घडामोडीदरम्यान अण्णामलाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांचीही भेट घेतली होती. या भेटीत पक्ष संघटनेच्या भविष्यातील दिशेबाबत आणि तामिळनाडूतील राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. पक्षाकडून त्यांना संघटनेत महत्त्वाची भूमिका देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते.दरम्यान, अण्णामलाई यांनी राजीनामा मागे घेण्याबाबत काही प्रमाणात नरमाई दाखवल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. तसेच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेतील अशीही अटकळ व्यक्त केली जात होती.
 
 
४ जून रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त चेन्नईत लावण्यात आलेल्या पोस्टर्समुळेही राजकीय वातावरण तापले होते. “आमचे नेते, आमचे नेतृत्व करा” अशा संदेशांनी त्यांच्या लोकप्रियतेचा दाखला मिळाला होता. माजी आयपीएस अधिकारी असलेले के. अण्णामलाई २०२० मध्ये भाजपमध्ये सामील झाले होते. २०२१ ते २०२५ या काळात त्यांनी तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले असून राज्यात पक्षाला नव्या पातळीवर पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो.