अशोक मामा’सोबतच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
मुंबई
Ashok Saraf  मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांनी बुधवारी (4 जून) आपला 79 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने चाहत्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीही अशोक सराफ यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.
 

Ashok Saraf   
छगन भुजबळ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये अशोक सराफ यांच्या अभिनय कारकिर्दीचे आणि व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. “मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि माझे मित्र पद्मश्री अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,” असे म्हणत त्यांनी त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाचा गौरव केला.
भुजबळ यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळताना कला क्षेत्राशी असलेले नाते त्यांनी कायम जपले आहे. अभिनयाच्या आवडीमुळे त्यांना अशोक सराफ यांच्यासारख्या अष्टपैलू कलाकारासोबत दोन मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या अनुभवामुळे दोघांमधील मैत्रीचे नाते अधिक दृढ झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी अशोक सराफ यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराचाही उल्लेख केला. हा सन्मान त्यांच्या दीर्घ अभिनय प्रवासाचा आणि कलासेवेचा सर्वोच्च गौरव असल्याचे सांगत मित्राच्या यशाचा अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मराठी रसिकांच्या अनेक पिढ्यांना आपल्या सहजसुंदर अभिनयाने निखळ आनंद देणारे अशोक मामा आजही नाटक आणि चित्रपट क्षेत्रात तितक्याच उत्साहाने कार्यरत आहेत. वयाच्या या टप्प्यावरही त्यांची कलेवरील निष्ठा आणि ऊर्जा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
दरम्यान, अशोक सराफ आणि छगन भुजबळ Ashok Saraf  यांच्या मैत्रीचा एक हृदयस्पर्शी प्रसंगही यानिमित्ताने चर्चेत आला आहे. अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत शिक्षणासाठी पॅरिसमध्ये असताना त्याची बॅग चोरीला गेली होती. त्या बॅगमध्ये त्याचा पासपोर्ट असल्याने नव्याने पासपोर्ट आणि विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करणे आवश्यक झाले होते. अल्पावधीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याला भारतात यावे लागणार होते. त्या कठीण काळात छगन भुजबळ यांनी मोठी मदत केल्याचा उल्लेख अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात केला आहे.भुजबळ हे नेहमीच आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले आणि वेळोवेळी मदतीला धावून आले, असे सांगत अशोक सराफ यांनी त्यांचा जवळचा मित्र म्हणून उल्लेख केला होता. वाढदिवसानिमित्त समोर आलेल्या या आठवणींमुळे दोघांमधील जिव्हाळ्याच्या मैत्रीची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.