नवी दिल्ली,
BCCI's strict stance भारतीय क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घेऊन परदेशी टी-20 लीगमध्ये खेळण्याचा वाढता कल पाहता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता अधिक कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय एक नवीन निवृत्ती धोरण तयार करत असून, खेळाडूंना परदेशी लीगमध्ये जाण्यासाठी भारतीय क्रिकेट सोडण्याच्या ट्रेंडवर आळा घालण्याचा विचार सुरू आहे.अलीकडच्या काळात काही भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन थेट परदेशी टी-20 लीगमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर हा मुद्दा बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या ऑनलाइन बैठकीत चर्चेत आला आहे. मात्र भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदाबाबत कोणतीही चर्चा या बैठकीच्या अजेंड्यावर नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अष्टपैलू खेळाडू विजय शंकरने अलीकडेच भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून, त्यानंतर लगेचच लंका प्रीमियर लीगमध्ये सहभागी होण्यासाठी करार केला आहे. याआधीही दिनेश कार्तिक, युवराज सिंग, उन्मुक्त चंद, प्रवीण तांबे आणि इरफान पठाण यांसारख्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेट सोडून परदेशी लीगचा मार्ग स्वीकारला आहे.सध्याच्या नियमांनुसार सक्रिय भारतीय क्रिकेटपटूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. त्यामुळेच अनेक खेळाडू परदेशात खेळण्यासाठी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे चित्र दिसत आहे. या वाढत्या प्रवृत्तीमुळे बीसीसीआय आता आपल्या धोरणात बदल करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. या बैठकीत केवळ खेळाडूंच्या निवृत्ती धोरणावरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय सहकार्याचाही आढावा घेतला जाणार आहे. मालदीव आणि फिजी क्रिकेट बोर्डांनी केलेल्या मदतीच्या विनंत्यांवरही चर्चा होणार असून, या देशांच्या क्रिकेट विकासासाठी कोणत्या प्रकारची मदत देता येईल यावर निर्णय अपेक्षित आहे.