राज्यसभेसाठी भाजपची 11 उमेदवारांची यादी जाहीर

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
BJP's list of candidates for Rajya Sabha नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाने होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीतील सर्वात मोठी घडामोड म्हणजे केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांना या वेळी उमेदवारी न देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. रवनीत सिंग बिट्टू हे पंजाबमधील प्रभावी नेते मानले जातात, तर जॉर्ज कुरियन हे केंद्र सरकारमधील एकमेव ख्रिश्चन मंत्री म्हणून ओळखले जातात. दोघेही विद्यमान राज्यसभा सदस्य असूनही त्यांना पुन्हा संधी न मिळाल्याने पक्षाच्या रणनीतीवर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
 
 
Rajya Sabha
 
या निर्णयानंतर मोदी मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदलाची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. काही कनिष्ठ मंत्र्यांना अलीकडे संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्याने पक्षात व्यापक बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी काही नेत्यांना राज्यसभेत पाठवून पक्ष संघटना आणि संसदीय प्रतिनिधित्वात नवा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही दिसून येते.या यादीत पक्षाने तरुण आणि संघटनात्मकदृष्ट्या सक्रिय चेहऱ्यांना प्राधान्य दिले आहे. राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ आणि राजस्थानचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांना प्रथमच राज्यसभेत प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
 
 
गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमधून विविध सामाजिक आणि प्रादेशिक प्रतिनिधित्व लक्षात घेऊन उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. ओबीसी आणि आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देण्यावरही पक्षाने विशेष भर दिला आहे.दरम्यान, अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आल्याने हे एक मोठे “रिप्लेसमेंट ड्राईव्ह” मानले जात आहे. यामध्ये काही वरिष्ठ नेत्यांना वगळण्यात आल्याने पक्षांतर्गत नवीन समीकरणे तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत.