नागभीड,
Bribery case नागभीड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भुकर मापक रंजीत कनोजकर व एका खाजगी व्यक्तीला 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार, 5 जून रोजी रंगेहात पकडले. वारस नोंद फेरफार करण्याच्या कामासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.
तक्रारदाराच्या आजोबांचे निधन झाले असल्याने त्यांच्या नावावर असलेली घराची जागा वडिलांच्या नावावर फेरफार (वारस नोंद) करायची होती. या कामासाठी तक्रारदाराने नागभीड येथील भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन भुकर मापक रंजीत कनोजकर यांच्याकडे अर्ज केला होता. हे काम करून देण्याच्या बदल्यात कनोजकर यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. परंतु, तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी थेट चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे 4 जून रोजी पंचांसमक्ष या प्रकरणाची पडताळणी करण्यात आली. त्यादरम्यान आरोपी कनोजकर यांनी तडजोडीअंती 10 हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले. त्यानुसार 5 जून रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराने लाचेच्या रक्कमेसाठी कनोजकर यांना फोन केला असता, त्यांनी ही रक्कम खाजगी व्यक्ती जयंत कामडी याच्याकडे देण्यास सांगितले. कामडी याने तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले. यासोबतच मुख्य आरोपी रंजीत कनोजकर यालाही अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
Bribery case ही कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात पार पडली. चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलिस निरीक्षक सचिन धर्मेजवार, अंमलदार रवीकुमार इंगळे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, सचिन गजभिये, मेघा मोहुर्ले, सतीश सिडाम, संदीप कौरासे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.