देवदूत डॉक्टरांच्या माणुसकीला सलाम...!

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
बेघर मनोरुग्ण प्रभुजी प्रमोद जाधव यांना नवे जीवन
यवतमाळातील सेवाभावी डॉक्टरांचा मानवतेचा आदर्श

यवतमाळ, 
caring doctor माणुसकी अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती देणारी एक हृदयस्पर्शी घटना यवतमाळ येथे घडली. ज्या व्यक्तीला स्वतःचे घर नाही, कुटुंब नाही, आधार नाही, अशा एका बेघर, निराधार आणि मनोरुग्ण बांधवाच्या जीवनात काही देवदूत माणसे देव बनून धावून आली आणि त्याला नवजीवन दिले. नंददीप फाऊंडेशनच्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात अनेक वर्षांपासून आश्रय घेत असलेले प्रभूजी प्रमोद जाधव हे काही दिवसांपूर्वी निवारा केंद्रात घसरून पडले. या अपघातात त्यांच्या कंबरेजवळील हाड गंभीररित्या फ्रॅक्चर झाले. आधीच आयुष्यभर दुःख, उपेक्षा आणि एकटेपणाचे ओझे वाहणाèया या निराधार जीवावर पुन्हा एकदा संकट कोसळले.
 
 
nanddeep
 
असह्य वेदनांनी विव्हळणाèया प्रमोद यांना तातडीने यवतमाळ येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रशांत कसारे यांच्याकडे दाखल करण्यात आले. तेथे झालेल्या तपासणीत मोठ्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले. लाखो रुपयांचा खर्च असलेल्या या शस्त्रक्रियेचा प्रश्न समोर उभा राहिला; मात्र याच क्षणी डॉक्टरांच्या रूपाने देवाने हात पुढे केला. डॉ. प्रशांत कसारे यांनी केवळ तपासणीच नाही, तर एक्स-रे, रक्त तपासणी, वैद्यकीय चाचण्या, औषधोपचार आणि संपूर्ण शस्त्रक्रिया पूर्णपणे निःशुल्क करण्याचा मानवतावादी निर्णय घेतला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी दोन तास अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून प्रमोद यांना नवजीवन दिले.
 
 
caring doctor  या सेवाकार्यात त्यांना साथ लाभली ती त्यांच्या सहचारिणी दंततज्ञ डॉ. रेखा प्रशांत कसारे यांची. रुग्णालयात दाखल प्रमोद यांना सुटी मिळेपर्यंत दररोज दोन्ही वेळचे भोजन स्वतःच्या जबाबदारीवर देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या संपूर्ण प्रक्रियेत प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांची भूमिकादेखील तितकीच मोलाची ठरली. मनोरुग्णाच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्यांनी ऑपरेशन सुरू होण्यापासून ते पूर्ण होईपर्यंत उपस्थित राहून आवश्यक मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. कविता बोरकर यांनीही सातत्याने सहकार्य केले. तसेच ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी अ‍ॅनेस्थेसिस्ट डॉ. हेमा फडके आणि डॉ. गौरी भोयर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शस्त्रक्रियेच्या यशामागे कसारे हॉस्पिटलचे आकाश धवने, वैभव ठाकरे, अर्चना मोरे, युतिका आणि सर्व कर्मचारी होते. नंददीपचे संदीप शिंदे, रेश्मा कंकाळ, सीमा आत्राम यांच्यासह संस्थेचे सहकारी देखील या संपूर्ण प्रक्रियेत रुग्णाला मानसिक आधार देत होते.