हनीमूनपूर्वीच अंत्यसंस्कार; तलाठ्याच्या मृत्यूने धक्का!

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
अंबाजोगाई (जि. बीड),
death-of-a-talathi : लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांत तलाठी पदावर कार्यरत असलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मृत गणेश दत्तू कोळी यांच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अंबाजोगाई पोलिसांकडून सुरू आहे.
 
 

death 
 
 
गणेश दत्तू कोळी हे चंद्रपूर महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत होते. यापूर्वी ते राज्य राखीव पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांनी तलाठी भरती परीक्षा उत्तीर्ण करून २०२४ मध्ये तलाठी पद मिळवले होते. १३ मे रोजी त्यांचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला होता. मात्र विवाहानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
 
गणेश यांच्या आई सुनंदा कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विवाहानंतर पत्नीच्या वागणुकीबाबत संशय निर्माण झाला होता. कुलदैवताच्या दर्शनासाठी गेले असताना ती वारंवार कोणाशी तरी लपून फोनवर बोलत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर घरात झालेल्या धार्मिक कार्यक्रमानंतरही तिच्या वागण्यात बदल जाणवत होता. तिने हे लग्न आपल्या इच्छेविरुद्ध झाल्याचे सांगत गणेश यांच्यासोबत राहण्यास नकार दिला आणि अंबाजोगाई येथे निघून गेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
 
२४ मे रोजी गणेश पत्नीला भेटण्यासाठी अंबाजोगाईतील मोरेवाडी येथे गेले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या बहिणीशी दूरध्वनीवर संपर्क साधून पत्नीचे अन्य एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला होता. पत्नीच्या डायरीत यासंदर्भातील नोंदी वाचल्याचेही त्यांनी सांगितल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
 
यानंतर काही वेळातच गणेश यांनी पत्नी राहत असलेल्या घरातील खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली. घटनेच्या वेळी त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
  
या प्रकरणात मृताच्या आईच्या तक्रारीवरून पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आत्महत्येमागील नेमके कारण आणि सर्व परिस्थितीचा पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत सर्व बाबींची शहानिशा केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.