हिंगणघाट,
G.B.M.M. High School हिंगणघाटच्या सध्याच्या देखण्या व नवनिर्मित जी.बी.एम.एम. हायस्कूल मधील उदवाहक (लिफ्ट) बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. शहरातील जी. बी. मोहता म्युनिसिपल ज्युनियर कॉलेजची जुनी इमारत जीर्ण झाली म्हणून आ. समीर कुणावार यांच्या पाठपुराव्यातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला गेला. नगर परिषदेच्या अंतर्गत येणारी ही भव्य, सुसज्ज आणि अद्यावत व देखणी इमारत जेव्हा उभी राहिली, तेव्हा तिचे कौतुकही झाले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तसेच आ. समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. या अत्याधुनिक इमारतीत विद्यार्थ्यांसाठी लिफ्टची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पण, लिफ्ट असूनही बंद असेल तर जनतेच्या पैशातून लिफ्ट लावण्यासाठी खर्च का करण्यात आला असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ज्या इमारतीत आधुनिक लिफ्ट बसवली आहे ती लिफ्ट आज धूळ खात बंद अवस्थेत पडून आहे.
G.B.M.M. High School हिंगणघाटात दिव्यांग विद्यार्थ्यांना हक्काच्या शिक्षणासाठी शारीरिक यातना सोसाव्या लागत आहेत. हे महाविद्यालय नगर परिषद प्रशासनाच्या अंतर्गत येते. नगर पालिकेचे प्रशासन इतके सुस्त आणि संवेदनशून्य कसे असू शकते असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. केवळ अद्यावत सुविधांचे प्रदर्शन करून आणि काचेच्या इमारती उभारून विकास होत नसतो. विकास तेव्हा होतो जेव्हा समाजातील शेवटच्या आणि गरजू घटकाला त्या सुविधेचा लाभ मिळतो. नगर परिषद प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
लिफ्ट तीन वर्षापासून बंद : प्राचार्य
आपण सन २०२३ मध्ये प्राचार्य पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हापासूनच या कनिष्ठ महाविद्यालयातील लिफ्ट बंद असल्याचे जीबीएमएम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य फुटाणे यांनी तरुण भारतसोबत बोलताना दिली. या संदर्भात नगरपालिकेशी पत्रव्यवहार केला. तंत्रज्ञालाही बोलवण्यात आले होते. परंतु, अद्याप लिफ्ट सुरू करण्यात आलेल्या नाही असेही प्राचार्य फुटाणे यांनी सांगितले.