मुंबई
Girija Oak मराठी अभिनेत्री गिरीजा ओक सध्या तिच्या आगामी ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या प्रमुख भूमिकेतील या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत गिरीजाने सोशल मीडियावरील एक अनोखा अनुभव शेअर केला आहे. कंगना राणौत यांची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत मोठी घट झाल्याचा खुलासा तिने केला.
एका मुलाखतीदरम्यान गिरीजा ओकने ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाविषयी माहिती देताना हा अनुभव सांगितला. येत्या 12 जून रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट समाजातील सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करणारा असल्याचे तिने सांगितले. सफाई कर्मचारी, पोलीस, परिचारिका आणि इतर सेवाभावी कर्मचाऱ्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान कामा रुग्णालयातील नर्सेसनी बजावलेल्या भूमिकेचे चित्रण करण्यात आले आहे.चित्रपटाच्या प्रचारासाठी सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि माहिती शेअर करत असताना तिने कंगना राणौत यांची एक पोस्टदेखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली होती. मात्र, त्यानंतर तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत हजारोंनी घट झाल्याचे तिने सांगितले. “मी कंगनाचा फोटो पोस्ट केल्यानंतर माझे फॉलोअर्स कमी झाले. मात्र काही वेळाने दुसरी पोस्ट टाकल्यानंतर पुन्हा फॉलोअर्स वाढले,” असे गिरीजाने नमूद केले.सोशल मीडियावरील प्रतिक्रियांबाबत आपले मत व्यक्त करताना ती म्हणाली की, प्रत्येकाला आनंदी ठेवणे शक्य नसते. फॉलोअर्सची संख्या वाढणे किंवा कमी होणे याला अतिमहत्त्व देण्याची गरज नसून, आपल्याला योग्य वाटणारे निर्णय घेऊन काम करत राहणे अधिक महत्त्वाचे आहे. “आपण सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही. शेवटी स्वतःला योग्य वाटणाऱ्या गोष्टींवर विश्वास Girija Oak ठेवून पुढे जात राहणे गरजेचे आहे,” असे तिने स्पष्ट केले.
दरम्यान, यापूर्वी कंगना राणौत यांनीही गिरीजा ओकच्या ‘नॅशनल क्रश’ या ओळखीवर विनोदी प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत त्यांनी गमतीने गिरीजाला “तुझ्या सौंदर्याचा वापर करून चित्रपटाची प्रसिद्धी कर” असे सांगितल्याचेही समोर आले होते.‘भारत भाग्य विधाता’ हा चित्रपट 12 जून रोजी प्रदर्शित होणार असून, त्यामधून 26/11 हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या धैर्याची कथा प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे.