मुंबई
Gram Chikitsalay Season 2 प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘ग्राम चिकित्सालय’ या प्राइम ओरिजिनल मालिकेचा बहुप्रतिक्षित दुसरा सीझन 23 जून 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा प्राइम व्हिडिओने केली आहे. ग्रामीण भारतातील आरोग्य व्यवस्थेचे वास्तव, गावकऱ्यांचे जीवन आणि त्यातील विनोदाची हलकीफुलकी फोडणी यामुळे पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता या मालिकेचा पुढील अध्याय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्दर्शक ललितम तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या मालिकेचे लेखन वैभव सुमन आणि श्रेया श्रीवास्तव यांनी केले आहे. ‘द वायरल फीवर’ निर्मित या मालिकेची कथा काल्पनिक भाथकंडी गावाभोवती फिरते. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेच्या समस्यांवर भाष्य करताना गावातील माणुसकी, संघर्ष, विनोद आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या मालिकेत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
दुसऱ्या सीझनमध्ये अमोल पराशर, Gram Chikitsalay Season 2 आकाश मखिजा, आनंदेश्वर द्विवेदी, विनय पाठक, आकांक्षा रंजन कपूर आणि गरिमा विक्रांत सिंग हे कलाकार त्यांच्या भूमिकांमध्ये पुन्हा झळकणार आहेत. याशिवाय भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव यांचीदेखील मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.पहिल्या सीझनचा शेवट ज्या टप्प्यावर झाला होता, तेथूनच नव्या पर्वाची कथा सुरू होते. डॉ. प्रभात हे पात्र साकारणारा अमोल पराशर भाथकंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नात दिसणार आहे. गावकऱ्यांचा विश्वास संपादन करताना आणि ग्रामीण भागातील विविध समस्यांना सामोरे जाताना त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. केवळ वैद्यकीय ज्ञान पुरेसे नसून समाजाशी नाळ जोडणे आणि त्यांच्या गरजा समजून घेणे किती महत्त्वाचे आहे, याचा शोध ही कथा घेते.प्राइम व्हिडिओ इंडियाचे डायरेक्टर आणि हेड ऑफ कंटेंट लायसनिंग मनीष मेघानी यांनी सांगितले की, पहिल्या सीझनला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर या मालिकेचा पुढील भाग प्रेक्षकांसमोर आणताना आनंद होत आहे. भावना, वास्तववाद आणि सामाजिक भाष्य यांचा समतोल साधणारी ही कथा प्रेक्षकांना पुन्हा एकदा खिळवून ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दिग्दर्शक ललितम तिवारी यांनीही दुसऱ्या सीझनबाबत उत्सुकता व्यक्त केली. ग्रामीण विनोदी नाटकाच्या चौकटीपलीकडे जाऊन ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण करण्याचा प्रयत्न या मालिकेत सातत्याने करण्यात आला आहे. ग्रामीण भारतातील दैनंदिन संघर्ष, सामाजिक बदल आणि मानवी नात्यांचे विविध पैलू प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न नव्या सीझनमध्येही कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘ग्राम चिकित्सालय’चा दुसरा सीझन 23 जून 2026 पासून भारतासह जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये हिंदी भाषेत केवळ प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.