तिवसा तहसीलवर गुरूदेवभक्तांचा ठिय्या

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
पीक विम्याच्या नावाखाली शेतकर्‍यांची थट्टा
तिवसा, 
heavy rainfall अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना न्याय मिळावा, पीक विम्याचा योग्य परतावा तातडीने मिळावा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ बहाल करण्यात यावा, या दोन मागण्यांसाठी गुरुवारी तिवसा तहसील कार्यालयावर शेकडो शेतकरी व गुरुदेव भक्तांनी आक्रमक ठिय्या आंदोलन छेडले. तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे तहसील परिसरात मोठी खळबळ उडाली.
 
 
VIMA
 
मागील खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील हजारो सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडले. अनेकांचे पीक पूर्णपणे हातचे गेले, तर पेरणी आणि काढणीचा खर्चसुद्धा निघाला नाही. काही शेतकर्‍यांनी हताश होऊन आपल्या उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवून संताप व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत शासनाने मदतीची घोषणा केली खरी, मात्र पीक विमा उतरविलेल्या शेतकर्‍यांच्या वाट्याला निराशाच आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेतकर्‍यांनी भरलेला विमा हप्ता हजारोंमध्ये आणि नुकसान लाखोंमध्ये; मात्र मोबदला मिळाला तो प्रति एकर २०० ते ३०० रुपये. या तुटपुंज्या मदतीमुळे संतप्त शेतकर्‍यांनी विमा कंपन्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. हा परतावा नसून शेतकर्‍यांच्या वेदनांची खिल्ली उडविण्याचा प्रकार आहे, अशी भावना आंदोलनस्थळी व्यक्त करण्यात आली.
 
 
heavy rainfall  अनेक विमाधारक शेतकरी आजही विमा लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे खरीप हंगाम २०२६-२७ सुरू होण्यापूर्वी सर्व पात्र सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना प्रति हेक्टर ३५ हजार रुपयांचा विमा परतावा तातडीने देण्यात यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, आंदोलनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ प्रदान करण्याची मागणीही जोरदारपणे करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, राष्ट्रसंतांनी केवळ अध्यात्म नव्हे तर राष्ट्रजागृती, ग्रामविकास, समाजसुधारणा आणि स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले. १९४२ च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांच्या विचारांनी हजारो युवकांना प्रेरित केले. त्यामुळे त्यांना ‘भारतरत्न’ देणे हा देशभक्तीच्या परंपरेचा गौरव ठरेल. तब्बल दोन तास चाललेल्या आंदोलनानंतर तहसीलदारांकडे निवेदन सादर करण्यात आले. सध्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असली तरी मागण्या मान्य न झाल्यास येत्या काही दिवसांत बेमुदत अन्नत्याग आंदोलनासह तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शेतकरी व गुरुदेव भक्तांनी दिला.