मंगरूळनाथ,
स्थानिक जय गजानन महाराज क्रीडा मंडळ तसेच वाशीम जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे खेळाडू महेश सुरेश ठाकरे व रोहित गजानन ठाकरे यांची भूतान येथे ७ ते ९ जून २०२६ दरम्यान होणार्या International Atypaty Sports Competition आंतरराष्ट्रीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
International Atypaty Sports Competition हैदराबाद (तेलंगणा) येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या यशामध्ये महेश ठाकरे व रोहित ठाकरे यांचा मोलाचा वाटा होता. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत त्यांनी महाराष्ट्र संघाला पदक मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाने उल्लेखनीय यश संपादन केले. राष्ट्रीय स्पर्धेतील याच उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत भारतीय आट्यापाट्या संघाच्या निवड समितीने महेश ठाकरे व रोहित ठाकरे यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड केली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली असून क्रीडा क्षेत्रात नवीन उत्साह निर्माण झाला आहे. यशाबद्दल वाशीम जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार श्याम खोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने, जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे, नगरसेवक प्रा. नंदलाल पवार, सहसचिव सतीश इंगोले, उन्मेष शिंदे, अजित बुरे, सुमित मुंधरे यांच्यासह विविध मान्यवरांनी दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले आहे. भूतान येथे होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना हे दोन्ही खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करणार असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.