लोकसभेच्या वाटेवर ममता? टीएमसीतील अंतर्गत घडामोडींना वेग

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
कोलकाता,
Mamata headed for the Lok Sabha पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. ममता बॅनर्जी लोकसभेत प्रवेश करण्यासाठी पोटनिवडणुकीचा मार्ग स्वीकारू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यासाठी पक्षातील एखाद्या खासदाराची जागा रिक्त करून त्यातून निवडणूक लढवण्याचा पर्याय त्यांच्या समोर असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी बहारामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, त्या जागेचे विद्यमान खासदार युसूफ पठाण यांनी जागा रिक्त करण्यास अनिच्छा दर्शवल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या राजकीय समीकरणात नवे वळण आले आहे.
 
Mamata
 
दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते हुमायून कबीर यांनी ममता बॅनर्जी यांच्यासाठी आपली जागा सोडण्याची तयारी दर्शवली असल्याची चर्चा आहे. राज्याच्या राजकारणात त्यांचे नेतृत्व कायम राहावे, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी लोकसभेचा पर्यायी मार्ग खुला होऊ शकतो. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. काही आमदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात नाराजी व्यक्त केल्याची चर्चा असून त्यामुळे पक्षांतर्गत आव्हानेही वाढली आहेत. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रिय होण्याचा विचार करत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मात्र, लोकसभेत प्रवेशाचा मार्ग त्यांच्यासाठी सोपा नसणार आहे. संबंधित मतदारसंघांमध्ये विरोधकांची ताकद, बदललेले राजकीय वातावरण आणि पक्षातील अंतर्गत घडामोडी यामुळे आगामी काळात पश्चिम बंगालचे राजकारण आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.