कोलकाता,
Firhad Hakim resigns कोलकाता महानगरपालिकेचे महापौर फिरहाद हकीम यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू केली आहे. शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या निर्णयाची घोषणा केली. तृणमूल काँग्रेसमधील वाढत्या अंतर्गत घडामोडी आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. फिरहाद हकीम हे २०१८ पासून कोलकात्याचे महापौर म्हणून कार्यरत होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी शहराच्या विविध विकासकामांमध्ये भूमिका बजावली. राजीनाम्याची घोषणा करताना त्यांनी पक्ष नेतृत्वाने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

विशेष म्हणजे, दोन दिवसांत दुसऱ्या महापौराने पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी बिधाननगरचे महापौर कृष्ण चक्रवर्ती यांनीही पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत स्थितीबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.गेल्या काही दिवसांपासून पक्षातील काही नेते आणि नगरसेवकांच्या राजीनाम्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशा परिस्थितीत हकीम यांच्या निर्णयामुळे पक्षासमोरील आव्हाने आणखी वाढल्याचे मानले जात आहे. फिरहाद हकीम हे तृणमूल काँग्रेसमधील प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी राज्य सरकारमध्ये विविध मंत्रिपदे सांभाळत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता कोलकाता महानगरपालिकेच्या पुढील महापौरपदी कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.