ममतांचे चिंतन आणि भविष्याची चिंता

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
अग्रलेख...
Mamata Banerjee गेल्या सुमारे तीन वर्षांपासून महाराष्ट्रात घुमत असलेल्या एका रडगाण्याचे सूर आता थेट पश्चिम बंगालपर्यंत पोहोचले आहेत. आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरले, बाप चोरला असा टाहो महाराष्ट्रातील जनता तीन वर्षांपासून ऐकत आली आहे. या काळात पुढे महाराष्ट्रात झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये पक्षचोरीच्या रडगाण्याला जनतेनेच चोख उत्तर दिले. आता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर अपेक्षेप्रमाणे पक्षचोरीचे रडगाणे तेथे घुमू लागले आहे. जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्हे उमटतात, तेव्हा ती पुसण्यासाठी अशा रडगाण्यांचे सूर कामी येतात, असे आता महाराष्ट्रापाठोपाठ पश्चिम बंगालमधील राजकारणातून स्पष्ट दिसू लागले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची पाळेमुळे पश्चिम बंगालमधून पुरती उखडली गेली आहेत आणि पक्षाला बंडखोरीच्या साथीने ग्रासले आहे.
 
 
Mamata
 
ममता बॅनर्जी यांनी ज्या नेत्यास पक्षातून निलंबित केले, त्याच नेत्याच्या पाठीशी या पक्षाच्या तब्बल 58 आमदारांनी आपली ताकद उभी केली आणि ममता बॅनर्जी व त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना एकाकी पाडून तृणमूलचा ताबा घेतला. गेल्या सुमारे 15 वर्षांपासून पश्चिम बंगालवर सत्ता गाजविणाèया तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात ही उभी फूट पडल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातील हे रडगाणे तिकडे आळविण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभेत विजयी झालेल्या 80 पैकी 58 आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून ऋतुब्रत बॅनर्जी यांची गटनेतेपदी निवड केल्यानंतर त्यांची विरोधी पक्षनेतेपदी झालेली निवड हे ममता बॅनर्जी यांच्या गेल्या 28 वर्षांच्या एकहाती नेतृत्वास दिले गेलेले आजवरचे सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. बंडखोर गटाने पक्षावर दावा केला आहे आणि ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या कारभारापासून दूर राहून केवळ सल्लागाराची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींची पुनरावृत्ती सुरू झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांना आत्मचिंतनाचा साक्षात्कार झाला असून त्याआधी पक्षातील सर्व विभाग विसर्जित करण्यात आले आहेत. या काळात आपल्या पाठीशी कोण आहे, हे वळून पाहण्याची त्यांना गरजही नाही. निवडणुकीत वाताहत झाल्यानंतर लगेचच ममता बॅनर्जी यांनी निमंत्रित केलेल्या पहिल्या चिंतन बैठकीकडे नऊ आमदारांनी पाठ फिरविली. आजमितीस 80 पैकी 58 आमदारांनी ममता बॅनर्जींचे नेतृत्व नाकारले आहे. गेल्या महिनाभरात या पक्षात पडद्यामागे अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर आता बंडखोर गटास विधिमंडळातील अधिकृत तृणमूल काँग्रेस म्हणून मान्यता मिळाली आहे आणि ममता बॅनर्जी यांनी पक्षावरील ताबा गमावला आहे. ममता सरकारच्या काळात पक्षाला मुठीत ठेवणाèया अभिषेक बॅनर्जी यांना या राज्यातील जनतेपाठोपाठ या गटानेही खड्यासारखे दूर केले. पुढच्या काळात ममता-अभिषेक यांच्या राजकीय नेतृत्वाचे भवितव्य काय असेल, ते स्पष्ट होणार आहे. कारण पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसभोवती घोंघावणारे हे वादळ केवळ विधिमंडळापुरते मर्यादित नाही. संसदेतील या पक्षाच्या खासदारांच्या भूमिकेवर आणि विरोधकांनी भाजपाला रोखण्यासाठी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेसच्या अस्तित्वावरही अनिश्चिततेचे सावट दाटले आहे.
 
 
Mamata Banerjee  पश्चिम बंगालमध्ये तब्बल 15 वर्षे सत्तेवर असलेल्या तृणमूल काँग्रेसमध्ये वेळोवेळी निर्माण होणारे मतभेद, नाराजीचे सूर काही नव्या बाबी नाहीत. मात्र, आता पडलेल्या फुटीची कारणे वेगळी आहेत. या घडामोडींमुळे ममता बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे संघटनात्मक आरोग्य, ममतांची नेतृत्वशैली आणि त्यांच्यासमोरील भविष्यातील राजकीय आव्हाने स्पष्ट झाली आहेत. कोणत्याही प्रादेशिक पक्षाची प्रतिमा ही त्याच्या नेत्याच्या व्यक्तिगत प्रतिमेशी जोडली गेलेली असते. महाराष्ट्रात शिवसेनेवर बाळासाहेबांच्या प्रतिमेची तर राष्ट्रवादी काँग्रेसवर शरद पवार यांच्या प्रतिमेची छाप होती. तृणमूल काँग्रेसचा तंबू ममता बॅनर्जी यांच्या एकखांबी नेतृत्वावर उभा होता. अशा प्रादेशिक व कुटुंबकेंद्रित पक्षांमध्ये संघटनात्मक नेतृत्वापेक्षा व्यक्तिकेंद्री नेतृत्व अधिक प्रभावी असते. असे दीर्घकाळ चालत राहते, तेव्हा अन्य नेत्यांमध्ये नाराजी मूळ धरू लागते. निर्णयप्रक्रियेत सहभाग मिळत नसल्याची भावना वाढीस लागते, नेतृत्वाच्या संधीचे प्रश्न निर्माण होतात, स्थानिक नेत्यांमध्ये हितसंबंधांचे संघर्ष वाढतात आणि सत्तेतील स्पर्धेतून फुटीची बीजे रुजू लागतात. महाराष्ट्रापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये आता तसेच घडताना दिसू लागले आहे. यातूनच काही नेते भाजपामध्ये गेले, काहींनी स्वतंत्र भूमिका घेतली तर काहींनी पक्षांतर्गत नाराजी उघडपणे व्यक्त केली. या घटना पाहता, ममता बॅनर्जी यांच्या अजेय प्रतिमेला मात्र मोठा तडा गेला आहे. 2011 पासून बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांचे वर्चस्व निर्विवाद राहिले आहे. या मोठ्या फुटीनंतरही शिल्लक राहिलेल्याच्या निष्ठावंतांचा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. ममता म्हणजेच तृणमूल अशी त्यांची भावना आहे. पक्षातील असंतोषाच्या उद्रेकात हा विश्वास डळमळीत झाला, तर ही भावनाही कमकुवत होऊ शकते. ममता यांचा उत्तराधिकारी मानल्या जाणाèया अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील जनतेच्या रोषाचा उद्रेक पश्चिम बंगालने नुकताच अनुभवला. आता बंडखोर गटाने तर पक्षाच्या नोंदीतून त्यांचे नाव हटविले आहे. या पक्षाचा जनाधार मानल्या जाणाèया ग्रामीण भागातील जनतेने आणि अल्पसंख्यक पाठीराख्यांनीही ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व नाकारले, तर या पक्षाचे पक्षचोरीचे रडगाणे कोणीच ऐकून घेणार नाही. त्यामुळे ममता जेव्हा पराभवाचे चिंतन करण्यासाठी सज्ज होतील, तेव्हा त्यांना अन्य राज्यांतील अशा घडामोडींकडे वळून पाहावे लागेल. एकूणच भारतीय राजकारणात प्रादेशिक पक्षांतील फूट किंवा बंड हा अपवाद नाही, तर जवळपास नियमच ठरला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील बंडानंतर पक्षाची शकले झाली आणि राजकीय समीकरणे बदलून गेली. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षात अनेकदा अंतर्गत संघर्ष झाले, पण ते शमवून पक्षसंघटना टिकविण्यात त्यांनी यश मिळवले. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षातही विविध टप्प्यांवर गटबाजी झाली. परंतु मजबूत संघटनात्मक चौकट असल्याने ती नियंत्रित राहिली. उत्तर प्रदेशातील मुलायम-अखिलेश यांच्यातील संघर्ष हे कौटुंबिक नेतृत्वाच्या वादाचे आणि मर्यादांचेही उदाहरण ठरले होते तर तामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या निधनानंतर अखिल भारतीय अण्णाद्रमुकमध्ये नेतृत्वाचा संघर्ष उफाळला होता.
 
 
Mamata Banerjee  पक्षफुटीच्या आणि बंडखोरीच्या या राजकीय घडामोडींमागे काही कारणांचे समान धागे दिसतात. व्यक्तिकेंद्रित नेतृत्वातून निर्माण होणाèया वारसा हक्काचा वाद आणि सत्तेच्या वाटपातील अन्य नेत्यांचा वाटा अशीच काही कारणे बंड आणि फाटाफुटीस कारणीभूत ठरतात असे दिसते. तरीही फूट पडल्यावर किंवा बंड उफाळल्यानंतर त्याचे खापर भाजपावर फोडण्याचा महाराष्ट्रातून सुरू झालेला पायंडा आता थेट पश्चिम बंगालपर्यंत पोहोचला आहे. ममता बॅनर्जी यांनी तेच करण्यास सुरुवात केली असली, तरी त्या जेव्हा पराभवाची मीमांसा करतील आणि पक्षांतर्गत नाराजीची कारणे शोधण्याकरिता चिंतन करतील, तेव्हा त्यांना प्रामाणिकपणे पक्षसंघटनेतील बाबींचाच विचार करावा लागेल. पक्षांतर्गत असंतोष, लोकशाही प्रक्रियेचा अवलंब, नेतृत्वावरील विश्वास टिकविण्याची शैली यामध्ये त्यांना याची बरीचशी उत्तरे सापडतील. भाजपावर आरोप करणे हे राजकीयदृष्ट्या सोयीचे स्पष्टीकरण असू शकते; परंतु ते संपूर्ण सत्य नसते, हे वास्तवही त्यांना स्वीकारावे लागेल. अनेकदा फुटीची कारणे पक्षाच्या घरातच दडलेली असतात. त्यामुळे तृणमूल काँग्रेसमधील फुटीकडे केवळ पश्चिम बंगालमधील एक राजकीय घटना एवढ्याच नजरेने पाहता येणार नाही. भारतीय प्रादेशिक पक्षांतील संघटनात्मक लोकशाहीचा अभाव ही समस्या यातून पुन्हा उघड झाली आहे. कोणताही प्रादेशिक पक्ष जोपर्यंत एका व्यक्तीभोवती केंद्रित झालेला असेल, तोपर्यंत फूट, बंड, गटबाजी आणि उत्तराधिकारी संघर्ष हे अटळ राहतील.