विकासकामांच्या माहितीच्या मागणीवरून वाद

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप : तिघांविरुद्ध गुन्हा

वणी, 
Mohurli Gram Panchayat तालुक्यातील मोहुर्ली ग्रामपंचायतीतील विकासकामांच्या माहितीच्या मागणीवरून निर्माण झालेला वाद आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी ग्रामपंचायत सचिवांच्या तक्रारीवरून एका पुरुषासह दोन महिलांविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मागील काही दिवसांपासून मोहुर्ली ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांवरील खर्च, मंजूर निधी, ग्रामसभेचे इतिवृत्त तसेच इतर प्रशासकीय कागदपत्रांची माहिती मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. या संदर्भात झालेल्या मासिक सभा व ग्रामसभांमध्येही नागरिकांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले होते. मात्र अपेक्षित माहिती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
 
 
gram panchs
 
Mohurli Gram Panchayat  ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, माहितीची मागणी होताच सरपंच आणि ग्रामपंचायत सचिव यांनी सभा अर्धवट सोडल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली. त्यानंतर 2 जून रोजी ग्रामस्थांनी स्वतंत्र बैठक घेऊन ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा ठराव मंजूर केला. या निर्णयानुसार 3 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले. या घटनेनंतर ग्रामपंचायत सचिव उल्हास नगराळे यांनी वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे कवडू वडसकर, योगिनी कोसारकर आणि पुष्पा काळे यांच्याविरुद्ध शासकीय कार्यालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम असून ग्रामपंचायतच्या विकासकामांची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित सर्व माहिती नागरिकांसमोर जाहीर करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे या प्रकरणाला पुढे कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
चौकशीच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम
ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या विकासकामांबाबत पारदर्शकता राखण्याची मागणी केली असून खर्चाचा तपशील, मंजूर निधी व कामांच्या अंमलबजावणीची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. यामुळे प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.