मुंबई,
Monsoon to cover Maharashtra नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अखेर केरळमध्ये प्रवेश केल्याने देशातील हवामानात मोठा बदल सुरू झाला आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातही मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून राज्यातील अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने त्रस्त असलेल्या नागरिकांना या बदलामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
तसेच सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा या भागांमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि गडचिरोली यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदा मान्सूनचे आगमन काही दिवस उशिरा झाले असले तरी आता पावसाळ्याला अधिकृत सुरुवात झाली असून पुढील काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात पूर्णपणे दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या बदलामुळे राज्यातील उष्णतेची तीव्रता कमी होऊन पावसाचा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.