नागपूर,
nagpur-government-hostel : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना निवास, भोजन तसेच शैक्षणिक साहित्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देत उच्च शिक्षणाच्या संधी अधिक व्यापक करण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागाच्या अधिपत्याखाली नागपूर जिल्ह्यात एकूण २५ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यामध्ये शहरी भागातील मागासवर्गीय मुला-मुलींसाठी १४ वसतिगृहे तसेच तालुका स्तरावरील ११ वसतिगृहांचा समावेश आहे. या वसतिगृहांमधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्याबरोबरच त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जातो.
या योजनेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची व भोजनाची सुविधा पूर्णतः मोफत दिली जाते. तसेच पुस्तके, वह्या आणि अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे.
प्रवेशासाठी अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक असून, त्यासाठी
https://hmas.mahait.org या संकेतस्थळाचा वापर करावा. शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया ३० जूनपासून सुरू होणार आहे. तर इयत्ता ११ वी, १२ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज १५ जुलैपासून स्वीकारले जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृहांचे अधीक्षक किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.