- दोन दिवसाचा ब्लॉक : वडसा-गडचिरोली नव्या रेल्वेमार्गाचे नॉन इंटरलॉकिंग
गोंदिया,
Nagpur Railway दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत वडसा-गडचिरोली नव्या रेल्वेमार्गाच्या कामासाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंगची महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी 6 जून रोजी प्री-नॉन इंटरलॉकिंग तर 7 जून रोजी नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहेत. तेव्हा गोंदिया - बल्लारशहा रेल्वेमार्गावरील काही मेमू व प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार असून दोन दिवस या रेल्वेगाड्यांचे परिचलन थांबणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 6 जून रोजी चार तासांचे प्री-नॉन इंटरलॉकिंग काम करण्यात येईल. या कालावधीत अभियांत्रिकी विभागाकडून डाउन साइडवरील पॉइंट क्रमांक 32 काढून त्याठिकाणी नवीन ट्रॅक टाकणे तसेच जुन्या मार्गाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या कामादरम्यान कोणत्याही रेल्वेमार्गावर ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यानंतर 7 जून रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून 8 जून रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पाच तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत नवीन इलेक्ट्रॉनिक यंत्रणेसोबत सर्व आउटडोअर गिअर्सचे पॅचिंग व स्थानकाचे कमिशनिंगचे काम पूर्ण केले जाणार आहे. या कामांमुळे रेल्वेगाडी क्रमांक 68815 बल्लारशाह-गोंदिया मेमू, रेल्वेगाडी क्रमांक 68816 गोंदिया-बल्लारशाह मेमू, गाडी क्रमांक 68804 गोंदिया-बल्लारशाह मेमू, गाडी क्रमांक 68806 गोंदिया-वडसा मेमू या रेल्वेगाड्या 7 जून रोजी रद्द राहणार आहेत. तर गाडी क्रमांक 68803 बल्लारशाह-गोंदिया मेमू, गाडी क्रमांक 68808 वडसा-चांदा फोर्ट मेमू, गाडी क्रमांक 68805 चांदाफोर्ट-गोंदिया मेमू प्रवासी रेल्वेगाड्यांचे परिचलन 8 जून रद्द करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी संबंधित गाड्यांची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.