विद्यार्थ्यांना विम्याऐवजी बँकिंगची प्रश्नपत्रिका मिळाल्याने परीक्षा ऐनवेळी रद्द

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
- रातुम नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थापनावर पुन्हा प्रश्नचिन्ह

नागपूर,
Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. बी.कॉम. सत्र ४ अंतर्गत बुधवारी होणारी ‘फंडामेंटल्स ऑफ इन्शुरन्स’ विषयाची परीक्षा चुकीची प्रश्नपत्रिका वितरित झाल्याने रद्द करावी लागली. या प्रकारामुळे ९०० हून अधिक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
 
 
NGP DKSL
विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेत विमा विषयाऐवजी ‘फंडामेंटल्स ऑफ बँकिंग’ या विषयावरील प्रश्न असल्याचे आढळून आले. विविध परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांनी तातडीने ही बाब परीक्षा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर संबंधित केंद्रांनी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाशी संपर्क साधला.
तक्रारींची पडताळणी केल्यानंतर विद्यापीठाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. मोतीराम ताडस यांनी या निर्णयाला दुजोरा देत, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून परीक्षा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच रद्द झालेली परीक्षा आता १० जून रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
- विद्यार्थ्यांचा संताप वाढला
अभ्यासक्रमानुसार तयारी करून आलेल्या विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका मिळाल्याने संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली. विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेतील निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
- घाईघाईत उत्तरतालिका तयार करण्याचे निर्देश
दरम्यान, विद्यापीठाने ‘उन्हाळी २०२६’ परीक्षांसाठी नमुना उत्तरतालिका (मॉडेल आन्सर की) तातडीने सादर करण्याचे निर्देश प्राध्यापक, अभ्यास मंडळे आणि अधिष्ठात्यांना दिले आहेत. बुधवारी सकाळी सूचना जारी करून सायंकाळी ऑनलाइन बैठकही घेण्यात आली. मात्र, अत्यल्प वेळेत उत्तरतालिका तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे चुका होण्याची शक्यता असल्याची चिंता काही प्राध्यापकांनी व्यक्त केली आहे.
Nagpur University  या घटनेमुळे विद्यापीठाच्या परीक्षा नियोजन, गुणवत्ता नियंत्रण आणि प्रशासकीय कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थी व पालकांकडून अधिक सक्षम आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्थेची मागणी होत आहे.