नागपूर,
nagpur-university : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डेटा सायन्स आणि बिग डेटा यांच्या वाढत्या प्रभावामुळे रोजगाराच्या जगात मोठे बदल होत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी भविष्याभिमुख पाऊल उचलले आहे. विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून बी.ए. अर्थशास्त्र (एईडीपी/ऑनर्स/ऑनर्स विथ रिसर्च) हा आधुनिक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्थशास्त्र हा केवळ महागाई, बेरोजगारी किंवा बाजारपेठेचा विषय नसून आजच्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील बदल समजून घेण्याची गुरुकिल्ली बनला आहे. डेटा सायन्स ‘काय घडत आहे’ हे सांगते, तर अर्थशास्त्र ‘ते का घडत आहे’ याचे उत्तर देते. त्यामुळे आर्थिक विश्लेषण, ग्राहकांचे वर्तन, गुंतवणूक, सार्वजनिक धोरणे आणि शाश्वत विकास यांसारख्या क्षेत्रांत अर्थशास्त्राचे महत्त्व वाढले आहे.
विद्यापीठाचा हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अनुषंगाने तयार करण्यात आला असून विद्यार्थ्यांना रोजगार, उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देतो. एईडीपी पर्यायात सहा महिन्यांची अप्रेंटिसशिप आणि प्रतिमाह १२ हजार ३०० रुपयांपर्यंत स्टायपेंडची संधी आहे. तर ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्चद्वारे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन आणि धोरण विश्लेषणाच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळणार आहे.
- विशेष आकर्षण
१. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि अर्थशास्त्राचा संगम
२. उद्योग-संलग्न अभ्यासक्रम
३. सहा महिन्यांची अप्रेंटिसशिप
४. स्टायपेंडची संधी
५. संशोधन व पीएच.डी.साठी भक्कम पाया
- करिअरच्या संधी
समंक विश्लेषक, आर्थिक सल्लागार, बँकिंग, वित्तीय सेवा, बाजार संशोधन, सार्वजनिक धोरण विश्लेषण, आरबीआय, एनएबीएआरडी, यूपीएससी, एमपीएससी तसेच संशोधन संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात.
विदर्भातील विद्यार्थ्यांना महानगरांमध्ये न जाता स्थानिक पातळीवर आधुनिक, उद्योगाभिमुख आणि संशोधनाधारित शिक्षण मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा अभ्यासक्रम प्रदेशाच्या मानवी भांडवल विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.