देवळी,
NCC's Green Warriors निसर्गाचा समतोल टिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन होणे काळाची गरज आहे. या दृष्टिकोनातून तरुण-तरुणींनी पुढे आले पाहिजे. एनसीसी छात्र सैनिकांनी सुरू केलेली ग्रीन वॉरियर्सची संकल्पना प्रशंसनीय असून पर्यावरण संवर्धन ही नागरिक चळवळ व्हावी, असे प्रतिपादन माजी खासदार रामदास तडस यांनी केले.
ते २१ महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत स्थानिक एसएसएनजे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनातर्फे आयोजित जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. सुनिता सोनारे, वनरक्षक मनीष सज्जन, वनरक्षक जाकीर शेख, प्रा. विवेक देशमुख, सौरभ कडू, प्रा. जगदीश यावले, प्रा मेघा फासगे, संतोष तुरक, गणेश शेंडे व एनसीसी अधिकारी तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एनसीसी छात्र सैनिकांना ’ग्रीन वॉरियर’ची शपथ देण्यात आली. याची सुरुवात महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या वृक्षांना ’हिरवी रिबन’ बांधून वृक्ष दत्तक योजना, ’झाडांवर पक्षांकरिता पानपोई’ उभारून निसर्ग संदेश देण्यात आला तसेच एनसीसी सभागृहाजवळ २० वृक्ष अतिथींच्या हस्ते लावण्यात आली. यावेळी पृथ्वी वाचवा संदेश देणारी पृथ्वीची प्रतिकृती छात्र सैनिकांनी दाखवून वसुंधरा वाचवा हा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी यावर्षीचा राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने दिला जाणारा पर्यावरण मित्र पुरस्कार एसएसएनजे महाविद्यालयातील प्रा. विवेक देशमुख यांना माजी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी ऑल इंडिया निलगिरी ट्रेकिंग तामिळनाडू येथील उटी येथे सहभागी झालेल्या स्नेहा मडकाम व पूर्वा कापटे यांना तसेच कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय निशानेबाजी स्पर्धेत सहभागी सार्जेंट यामिनी पारधी यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक कॅप्टन मोहन गुजरकर यांनी केले. संचालन सार्जंट साक्षी पारिसे व सीनियर अंडर ऑफिसर कल्याणी लिखार यांनी केले तर आभार आरती मरघडे हिने मानले.