पाटस
Patas firing incident पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस परिसरात शुक्रवारी भरदुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. यवतमधील गरदडे कॉम्प्लेक्स परिसरात झालेल्या या प्रकारामुळे काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीनंतर तीन ते चार राऊंड गोळीबार झाल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील काही तरुण पाटस परिसरातील गरदडे कॉम्प्लेक्स येथे आले होते. यावेळी त्यांचा स्थानिक तरुणांशी किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती असून या गोंधळात एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले.घटनेदरम्यान अचानक तीन ते चार राऊंड गोळीबार करण्यात आल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. गोळीबाराचा आवाज ऐकताच नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलिसांची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.गोळीबारानंतर संबंधित Patas firing incident आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत काही संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाल्याने पोलिसांना गर्दी नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करावे लागले.
दरम्यान, गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. किरकोळ वादातून इतक्या गंभीर स्वरूपाची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.