पुणे
Pune Nasrapur girl murder case पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणाच्या खटल्याला न्यायालयीन पातळीवर वेग आला असून, या प्रकरणात वैद्यकीय पुरावे निर्णायक ठरत असल्याचे समोर आले आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने भक्कम पुरावे सादर करत आपली बाजू अधिक मजबूत केली.
या प्रकरणातील आरोपी कांबळेवर अवघ्या 28 दिवसांत आरोप निश्चित करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान ससून रुग्णालयातील शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात आली. या डॉक्टरांनी न्यायालयात दिलेल्या जबाबात पीडितेवर मृत्यू होण्यापूर्वी अत्यंत क्रूर स्वरूपाचे लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट केले. या वैद्यकीय निष्कर्षांना खटल्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक पुरावा मानले जात आहे.
सरकारी पक्षाने या प्रकरणात एकूण 82 साक्षीदारांची विस्तृत यादी न्यायालयात सादर केली असून, घटनेची साखळी स्पष्ट करण्यासाठी विविध प्रकारच्या साक्षीदारांचा समावेश करण्यात आला आहे. गुरुवारच्या सुनावणीतच सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात आली असून आतापर्यंत सुमारे 30 साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाली आहे. हा खटला सध्या दररोज सुनावणीसाठी न्यायालयासमोर येत आहे.
या साक्षीदारांमध्ये Pune Nasrapur girl murder case पीडितेचे कुटुंबीय, घटनास्थळी शोधमोहीम राबविणारे स्थानिक पथक, सीसीटीव्ही फुटेजशी संबंधित तांत्रिक तज्ज्ञ, पंच तसेच ससून रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. काही बाल-साक्षीदारांचे जबाबही नोंदवले जात आहेत, ज्यामुळे प्रकरणातील घटनाक्रम अधिक स्पष्ट होत असल्याचे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे.
या संवेदनशील खटल्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, पुढील सुनावण्यांमध्ये आणखी महत्त्वाचे पुरावे आणि साक्षी नोंदवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.