आधुनिकतेसोबत जपली 98 वर्षांची परंपरा

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
पुणे,
pune-news : पुण्यातील सदाशिव पेठेतील बाजीराव रोडवर असलेली ‘ज्ञानेश्वर फ्लोअर मिल’ ही केवळ एक गिरणी नसून शहराच्या समृद्ध व्यावसायिक आणि सांस्कृतिक वारशाची साक्ष देणारी संस्था आहे. तब्बल 98 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही गिरणी आजही चौथ्या पिढीकडून यशस्वीपणे चालवली जात असून परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो.
 
 
 
pune-news
 
 
सन 1928 मध्ये नारायण सखाराम चक्के यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कर्ज काढून या गिरणीची स्थापना केली. सुरुवातीला भाडेतत्त्वावर सुरू झालेला हा व्यवसाय हळूहळू पुणेकरांच्या विश्वासाचा केंद्रबिंदू बनला. त्या काळात गिरणीत फक्त दोन यंत्रे आणि एक हॉलर होते. विशेषतः भात भरडण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जात असे. शेतकऱ्यांकडून आणलेला आंबेमोहोर तांदूळ येथे भरडून ग्राहकांना दिला जात होता. जवळपास 75 वर्षे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू होता.
 
नारायण चक्के यांना समाजकार्यातही विशेष रस होता. त्यांनी नसरापूर इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीचे तब्बल 27 वर्षे संचालन केले. तसेच कुटुंबातील ईश्वर चक्के यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. 1942 च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांना याच गिरणीतून अटक करण्यात आली होती आणि त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.
 
सन 1961 मध्ये गिरणीची जागा विकत घेतल्यानंतर व्यवसायाला अधिक स्थैर्य मिळाले. पुढे 1977 मध्ये कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या निधनानंतर व्यवसायाची जबाबदारी सुधीर चक्के यांच्यावर आली. त्यांनी आपले शिक्षण आणि इतर व्यवसाय बाजूला ठेवून कुटुंबाची परंपरा पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या काळात गिरणीत मोठे बदल करण्यात आले. विविध धान्ये आणि मसाल्यांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली.
 
आज या गिरणीत 13 अत्याधुनिक यंत्रे कार्यरत आहेत. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळी, थालीपीठ भाजणी, चकली भाजणी, उपवासाची पिठे, साखर, खारीक, खोबरे, धने, रवा, हळद आणि गोडा मसाला यांसाठी स्वतंत्र मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पदार्थांमध्ये मिश्रण होत नाही आणि स्वच्छतेचे उच्च मानदंड कायम राखले जातात.
 
कुटुंबातील चौथी पिढी म्हणून रुपाली चक्के यांनी 2012 पासून व्यवसायाची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली. यापूर्वी त्या चार्टर्ड अकाउंटंट म्हणून 17 वर्षे कार्यरत होत्या. मात्र कुटुंबाची परंपरा जपण्यासाठी त्यांनी गिरणी व्यवसायात सक्रिय सहभाग घेतला. बदलत्या काळाची गरज ओळखत त्यांनी ‘स्नेह फूड्स’ या नावाने तयार पिठे, भाजण्या आणि घरगुती मसाल्यांचे उत्पादन सुरू केले.
 
रेडीमेड खाद्यपदार्थांच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक गिरण्यांवर परिणाम झाला असला, तरी गुणवत्ता, स्वच्छता आणि विश्वासाच्या जोरावर ज्ञानेश्वर फ्लोअर मिल आजही पुणेकरांची पहिली पसंती ठरत आहे. सदाशिव पेठ सोडून इतर भागात स्थायिक झालेले अनेक ग्राहकदेखील खास या गिरणीतून भाजणी, मसाले आणि पिठे घेण्यासाठी आवर्जून येतात.
 
जवळपास शतकभराची परंपरा जपत काळानुसार बदल स्वीकारणारी ज्ञानेश्वर फ्लोअर मिल आजही पुण्याच्या जिवंत वारशाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते.