पुणे
Ramesh Kharmale पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात निसर्गसंवर्धनाचे प्रेरणादायी उदाहरण घडवत असलेले वनरक्षक रमेश खरमाळे सध्या चर्चेत आहेत. विकासाच्या नावाखाली वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर होत असलेल्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर, खरमाळे यांनी डोंगराळ भागात केलेले हरितीकरण आणि जलसंधारणाचे काम विशेष लक्षवेधी ठरत आहे.
भारतीय सैन्य दलात 17 वर्षे सेवा बजावल्यानंतर 2012 मध्ये निवृत्त झालेल्या रमेश खरमाळे यांनी निसर्गसंवर्धनाच्या कार्याला आपले ध्येय बनवले. सध्या ते जुन्नर येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असून, सेवा आणि समाजकार्य यांचा समतोल साधत ते पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने योगदान देत आहेत. डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड, बीजारोपण आणि रोपवाटिका निर्मिती करून त्यांनी परिसरात हरित क्षेत्र वाढविण्यास हातभार लावला आहे.त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू जलसंधारण असून, त्यांनी आतापर्यंत 70 हून अधिक जलशोषक चर खोदून सुमारे 8 लाख लिटर पाणी जमिनीत मुरविण्याचे कार्य केले आहे. यासोबतच पशुपक्ष्यांसाठी पाणवठे तयार करून वन्यजीवांच्या संवर्धनालाही त्यांनी हातभार लावला आहे. दररोज बिया गोळा करून त्यांचे रोपांमध्ये रूपांतर करणे, डोंगर-दऱ्यांमध्ये बीजारोपण करणे आणि स्थानिक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
वनवा रोखण्यासाठी श्रमदान Ramesh Kharmale मोहिमा, जखमी पशुपक्ष्यांचे रेस्क्यू कार्य, तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये पर्यावरण जनजागृती उपक्रम राबवून ते नव्या पिढीमध्ये पर्यावरणाबाबत संवेदनशीलता निर्माण करत आहेत. याशिवाय जुन्नरच्या ऐतिहासिक व नैसर्गिक वारशाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचेही कार्य ते सातत्याने करत आहेत.रमेश खरमाळे यांच्या या योगदानाची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’, महाराष्ट्र शासन वनविभागाचे रजत पदक आणि इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यामुळे जुन्नर परिसरात पर्यावरण संवर्धनाचा एक सकारात्मक आदर्श निर्माण झाला असून, ते अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत.