बी.कॉम फंडामेंटल ऑफ इन्शुरन्सच्या पेपरमध्ये चुकीचे प्रश्न

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
रातुम नागपूर विद्यापीठाचा सावळा गोंधळ
 
हिंगणघाट,
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University Examinations राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार काल गुरुवार ४ रोजी चव्हाट्यावर आला. विद्यार्थी व पालकांनी आवाज उठवल्यानंतर विद्यापीठाने पेपर रद्द केल्याचे परिपत्रक जाहीर केले. संबंधित विषयाचा पेपर १० रोजी घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे. गुरुवार ४ जून रोजी बी.कॉम चतुर्थ सत्राचा फंडामेंटल ऑफ इन्शुरन्स या विषयाचा पेपर होता. मात्र, येथील रा. सू. बिडकर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर पेपर विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. प्रश्नपत्रिकेत फंडामेंटल ऑफ इन्शुरन्स ऐवजी बँकिंग विषयाशी संबंधित प्रश्न विचारले गेले असल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले.
 
 
ngp
 
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University Examinations  प्रश्नपत्रिका हातात पडताच परीक्षार्थी गोंधळून गेले. अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न पाहून विद्यार्थ्यांनी केंद्रप्रमुखांकडे तक्रार केली. केंद्रप्रमुखांनी विषय शिकविणार्‍या प्राध्यापकांशी संपर्क साधून प्रश्नपत्रिकेची शहानिशा केली असता त्यात बँकिंग क्षेत्राशी संबंधित प्रश्न असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शयता निर्माण झाली होती. देशभर विविध परीक्षांच्या गोंधळाचे प्रकरण गाजत असतानाच रातुमं नागपूर विद्यापीठाने केलेल्या या चुकीच्या कारभारामुळे पालकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक मोतीराम तडस यांनी या प्रकरणी जबाबदार विषय तज्ज्ञांना जाब विचारला जाईल, असे स्पष्ट केले आहे. आता विद्यापीठ प्रशासन संबंधित दोषींवर काय कारवाई करते आणि विद्यार्थ्यांच्या वेळेचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
१० जूनला होणार फेरपरीक्षा
या गंभीर प्रकरणाची दखल घेत रातुमं नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने तात्काळ पावले उचलली आहेत. नागपूर विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार तांत्रिक कारणामुळे ४ जून रोजीचा फंडामेंटल ऑफ इन्शुरन्स विषयाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. आता या विषयाचा पेपर १० जून रोजी सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत त्याच परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे.