मुंबई,
repo rate was the same मुंबईत झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केले की सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा सखोल आढावा घेतल्यानंतर रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे गृहकर्जदारांना मोठा दिलासा मिळाला असून कर्जाच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही.गेल्या काही महिन्यांपासून जागतिक पातळीवर सुरू असलेल्या भूराजकीय तणाव, पुरवठा साखळीतील अडथळे आणि ऊर्जा दरांतील वाढ यांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे आरबीआयने नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर महागाईच्या अंदाजात काही प्रमाणात वाढ दिसून येत असली तरी देशातील किरकोळ महागाई अद्याप लक्ष्य मर्यादेत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की सध्याच्या काळात अनिश्चितता असली तरी भारतीय अर्थव्यवस्था स्थिरतेकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे केंद्रीय बँकेने ‘न्यूट्रल’ धोरण कायम ठेवत व्याजदरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. धोरण ठरवताना पुढील काळात उपलब्ध होणाऱ्या आर्थिक आकडेवारीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयाचा थेट फायदा गृहकर्जदारांना होणार आहे. रेपो रेट स्थिर राहिल्यामुळे बँकांकडून गृहकर्जावरील व्याजदर वाढण्याची शक्यता नाही, त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांचे ईएमआय स्थिर राहतील. आगामी काळात रिअल इस्टेट क्षेत्रालाही या निर्णयामुळे सकारात्मक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.