यवतमाळ,
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत कोणालाही न सांगता गुपचुप उमेेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या Sahebrao Kamble साहेबराव कांबळे यांच्यावर काँग्रेसने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. पक्षाने त्यांचे प्राथमिक सदस्यत्व आणि संघटनेतील पदे रद्द केली आहेत. काँग्रेसने साहेबराव कांबळे यांना विधान परिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर मोठ्या शक्तिप्रदर्शनासह त्यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आला होता. तसेच मतदारांच्या भेटीगाठी आणि प्रचारालाही सुरुवात झाली होती.
मात्र, निवडणुकीच्या निर्णायक टप्प्यावर साहेबराव कांबळे यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतला. पक्षाच्या म्हणण्यानुसार, उमेदवारी मागे घेण्यापूर्वी स्थानिक नेते किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे पक्षशिस्तीचे उल्लंघन झाल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने साहेबराव कांबळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून आगामी काळात या घडामोडींचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साहेबराव कांबळे विरोधात जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाèयांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यवतमाळ येथे महाविकास आघाडीकडून ‘जोडे मारो’ आंदोलनही करण्यात आले.
काँग्रेसची पोरकट आणि हास्यास्पद मागणी
Sahebrao Kamble अंतिम टप्प्यात केवळ एकच उमेदवार शिल्लक राहिला तरी मतदारांना त्या उमेदवारास निवडण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार मिळावा यासाठी संबंधित उमेदवारासोबत ‘नोटा’ हा पर्याय उपलब्ध करून द्यावा आणि मतदारांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी काँग्रेसच्या निवेदनातून करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी आपल्या पक्षालाही विश्वासात न घेता किंवा कोणालाही न सांगता आपली उमेदवारी परत घेऊन टाकली. कांबळे यांच्या या धक्कादायक कृतीने तोंडावर पडलेल्या काँग्रेसने हा विश्वासघात आहे, आमच्या पाठीत त्यांनी खुपसलेला खंजीर आहे, अशा शब्दांत आपल्याच पक्षाच्या माणसाची संभावना केली आहे. त्यांच्याच पक्षामुळे महाविकास आघाडीचीसुद्धा पंचाईत झाली असल्याचा मुद्दा सौम्य करण्यासाठी ‘नोटा’ या पर्यायाची पोरकट, हास्यास्पद आणि असांसदीय मागणी करून आपली लाज सांभाळण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.