रिसोड,
Sexual assault case अल्पवयीन मुलीचे अपहरण करत बलात्कार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस आजीवन कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल ३० मे रोजी दिला. रिसोड पोलिस ठाण्यात २८ फेब्रुवारी २०२५ रोजी १७ वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, तुकाराम सखाराम कांबळे (वय ६०) रा. जोगेश्वरी, ता. रिसोड याने पीडितेला नातेवाईक असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला शेतात नेऊन जीवे मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केला. पीडिता अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
Sexual assault case या प्रकरणी रिसोड पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार तसेच पोसो कायद्यातील कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर नागरे यांनी सखोल तपास करून आवश्यक पुरावे गोळा करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी सुनावनीअंती आरोपी तुकाराम कांबळे यास दोषी ठरवत बीएनएस कलम ७१ अन्वये आजीवन कारावास सुनावला. तसेच कलम १३७ (२) व ३५१(३) अंतर्गत प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास प्रत्येकी तीन महिन्यांचा सश्रम कारावास भोगावा लागेल. तपास अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर नागरे, प्रमुख जिल्हा सरकारी अभियोक्ता म्हणुन अभिजीत व्यवहारे यांनी काम पाहिले.