जीव दिला असता, तरी लोक हसले असते..

मराठी अभिनेत्रीने सुनावले , ट्रोलर्सना म्हणाली ‘भुंकत राहा..

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
मुंबई
Shilpa Shinde लोकप्रिय हिंदी मालिका ‘भाभीजी घर पर हैं’ मधील अंगुरी भाभीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांत तिने कॉमेडियन भारती सिंह यांच्या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीतील वक्तव्यांमुळे आणि त्यानंतर सोशल मीडियावर झालेल्या प्रतिक्रियांमुळे वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिल्पाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत ट्रोलर्सना उत्तर दिले असून, तिच्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटले आहे.
 

Shilpa Shinde, Shilpa Shinde viral video 
काय म्हणाली शिल्पा
या व्हिडीओमध्ये ती पुढे म्हणते, “मी स्वत: त्यावेळी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत होते. पण तरीही लोक माझ्यावर हसले असते आणि शिव्या दिल्या असत्या. पण जेव्हा तुम्ही चुकीचे नसता, तेव्हा तुम्हाला कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही. मला त्यावेळीही कोणी पाठिंबा दिला नव्हता. त्यामुळे मला आजही कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही. मी ट्रोलिंगसाठी तयार आहे. जे खरंच निर्मात्यांना त्रास देतात, शिवीगाळ करतात, ते 10-15 वर्षे काम करून जातात. पण माझ्यासारखे कलाकार मूर्ख ठरतात. आम्हाला सत्याने जगायचं असतं. जे भुंकत आहेत, त्यांनी भुंकर राहावं. मला काही फरक पडत नाही.”
 
 
शिल्पा शिंदेने आपल्या व्हिडीओमध्ये बोलताना सांगितले की, काही वर्षांपूर्वी संबंधित मालिकेच्या निर्मात्यांशी झालेल्या वादानंतर तिने मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात केलेल्या काही आरोपांबाबत आता वेगळ्या संदर्भात चर्चा होत असल्याचे तिने नमूद केले. सोशल मीडियावर सुरू असलेल्या टीकेला उत्तर देताना ती म्हणाली की, तिच्याविरोधात ‘पीआर मोहीम’ चालवली जात असल्याचा तिला संशय आहे आणि परिस्थिती समजून न घेता लोक प्रतिक्रिया देत असल्याचे तिने म्हटले.
या व्हिडीओमध्ये शिल्पाने भावनिक होत आपला भूतकाळही उलगडला. “त्या काळात मी खूप कठीण मानसिक अवस्थेत होते. माझ्यासोबत जे घडले ते लोकांना पूर्णपणे माहिती नाही,” असे सांगत तिने त्या काळातील वेदनादायक अनुभवांचा उल्लेख केला. तिने पुढे असेही म्हटले की, त्या कठीण काळात तिला कोणाचाही पाठिंबा मिळाला नाही, मात्र आज तिला कोणाच्या मान्यतेची गरज नाही.शिल्पाने आपल्या वक्तव्यात आत्महत्येच्या विचारांबाबतही उल्लेख करत भावनिक प्रसंग शेअर केला. तिच्या म्हणण्यानुसार, त्या काळात तिला अनेक मानसिक संघर्षांना सामोरे जावे लागले होते. तथापि, तिने स्पष्ट केले की ती आता ट्रोलिंगसाठी तयार असून, कोणाच्याही टीकेचा तिच्यावर परिणाम होत नाही.
 
सोशल मीडियावर तिच्या या व्हिडीओनंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण तिच्या भूमिकेचे समर्थन करत आहेत, तर काही जण तिच्या वक्तव्यांवर टीका करत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा मनोरंजन विश्वातील वाद आणि कलाकारांवरील सोशल मीडिया ट्रोलिंग यावर चर्चा सुरू झाली आहे.