सुदामा भक्ती, कृष्णतत्त्व आणि परीक्षित मोक्षाच्या दिव्य संदेशात

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
श्रीमद्भागवत कथा सप्ताहाची सांगता

यवतमाळ, 
Srimad Bhagavat katha  पुरुषोत्तम मास पर्वानिमित्त माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने आयोजित श्रीमद्भागवत कथा सप्ताहाची भक्तीमय वातावरणात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण सांगता झाली. अंतिम दिवशी बालयोगी विष्णूप्रसाद अरोरा महाराजांनी श्रीकृष्णतत्त्व, सुदामा चरित्र, परीक्षित मोक्ष, दत्तात्रयांच्या 24 गुरुंचे जीवनदर्शन, तसेच भागवताचे आध्यात्मिक महत्त्व अत्यंत ओजस्वी आणि प्रभावी शब्दांत भाविकांसमोर उलगडले. कथेच्या प्रारंभी महाराजांनी भगवान श्रीकृष्ण हे योगेश्वर असल्याचे सांगत ते कोणत्याही गोष्टीबद्दल आसक्त नसून कर्म, प्रेम, भक्ती आणि धर्म यांचा अद्भुत समतोल साधणारे आहेत असे स्पष्ट केले. जीवनात तन, मन आणि साधना यांचे संतुलन राखल्यास आत्मिक समाधान आणि खèया अर्थाने आनंद प्राप्त होतो, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
 
 
katha
 
यावेळी श्रीकृष्णांच्या आठ पट्टराण्यांचे आध्यात्मिक विश्लेषण करताना रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती, कालिंदी, मित्रवृंदा, नाग्नजिती, भद्रा आणि लक्ष्मणा या आठ पटराण्या भक्तीच्या विविध भावभावनांचे प्रतीक असल्याचे महाराजांनी स्पष्ट केले. भगवान प्रत्येक भक्ताच्या भावना, श्रद्धा आणि प्रेमानुसार त्याला स्वीकारतात, हा गूढ आध्यात्मिक संदेश यावेळी देण्यात आला. भोमासुर वधाच्या प्रसंगातून अधर्म, अहंकार आणि दुष्ट प्रवृत्तीचा अंत निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. सुदामा चरित्राचे वर्णन करताना महाराजांनी खरी मैत्री, साधेपणा आणि निष्काम भक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. श्रीकृष्ण आणि सुदामा यांचे नाते केवळ मैत्रीचे नसून भक्त आणि भगवान यांच्यातील आत्मिक प्रेमाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. जो देवाच्या अधिक समीप जातो, त्यालाच खरे समाधान, कृपा आणि आत्मिक सुख प्राप्त होते, असा भावपूर्ण संदेश यावेळी देण्यात आला.
 
  
Srimad Bhagavat katha  दत्तात्रयांच्या 24 गुरूंचा उल्लेख करत महाराजांनी सांगितले की, जीवनातील प्रत्येक घटना, प्रत्येक व्यक्ती आणि निसर्गातील प्रत्येक घटक हा माणसाला काही ना काही शिकवण देत असतो. सतत शिकत राहणे, आत्मचिंतन करणे आणि जीवनातील प्रत्येक अनुभवातून ज्ञान ग्रहण करणे हेच आध्यात्मिक प्रगतीचे खरे साधन असल्याचे त्यांनी नमूद केले. परीक्षित मोक्षाच्या प्रसंगाचे विवेचन करताना महाराजांनी भागवत ही केवळ कथा नसून संपूर्ण जीवनाचे दर्शन घडवणारा महान ग्रंथ असल्याचे सांगितले. भागवत माणसाला स्वतःची ओळख करून देते, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते आणि लोक-परलोक दोन्ही सुंदर करण्याची प्रेरणा देते, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महाराजांनी संकल्पाचे महत्त्वही विशेष अधोरेखित केले. चांगल्या कार्यासाठी पहिले पाऊल उचलणे आणि दृढ संकल्पाने भक्ती व साधनेचा मार्ग स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण कथेदरम्यान भाविकांनी मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने सहभाग घेतला.