वेध
प्रफुल्ल व्यास
The Great Green Wall and the Death Warrant! उन्हाळा सपाटून तापतो, पाऊस बेसुमार पडतो, हिवाळा झाला तर असह्य नाही तर तसाच निघून जातो! पाऊस मात्र आता बाराही महिने अधूनमधून पडत असतो. एकंदरीत हे सारं का होतं आहे, याचं भाषण आज 5 जून या पर्यावरण दिनापासून आपणा सर्वांना ऐकायचं आहे. आपण जे पर्यावरणाला ओरबाडतो त्याचे पाप ‘याचि जन्मी याची डोळा’ बघतो आहोत, अनुभवतोही आहोत. आज पर्यावरण दिन. रोहिणी नक्षत्र सुरू आहे अन् चार दिवसांनी मृग नक्षत्र लागणार आहे. रोहिणीत तुरळक पाऊस येतो आणि मृगात बरसतो. पण, सद्यस्थिती पार बदलली आहे. मृगात आला तर आला, नाही तर पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. एखाद वेळी मृगात बरसतो, शेतकरी पेरणी करतो; पण पाऊस गायब होतो आणि दुबार-तिबार पेरणीची वेळ येते. पुढे शेतकरी आत्महत्या वगैरे वगैरे... पण, या सर्व गोष्टीला कारणीभूत कोण ठरते आहे तर सर्वज्ञानी असलेला मनुष्य! ओरबाडण्यातून आता कोणतेही क्षेत्र सुटले नाही. सर्व ओरबाडून झालेले आहे. त्याचे प्रत्यक्ष आणि भयंकर दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. पण, त्यातून काही बोध घेईल तो मनुष्य कसला? आता हेच बघा नं, आपल्या सह्याद्री पर्वत रांगांप्रमाणे अरावली पर्वतरांग आहे. भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग म्हणून तिची ओळख आहे. तिचा विस्तार प्रामुख्याने उत्तर-पश्चिम भारतात 700 किलोमीटरपर्यंत आहे. अरावलीतील सर्वात उंच शिखर ‘गुरुशिखर’ माऊंट अबू येथे असून त्याची उंची 1 हजार 722 मीटर म्हणजे 5 हजार 650 आहे. ही पर्वतरांग राजस्थानातील वाळवंटाचा विस्तार पूर्वेकडे होण्यापासून थांबवण्यास मदत करतात आणि उत्तर भारताच्या पर्यावरणीय संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावतात.
राजस्थानपासून दिल्ली आणि पुढे गुजरातपर्यंत पसरलेली ही पर्वतरांग उत्तर भारताच्या हवामान, पर्यावरण आणि जीवन व्यवस्थेचा एक भाग आहे. अरावली पर्वतरांग आधी कुरतडली जात होती. हळूहळू ती पोखरली गेली आणि आता ती शेवटच्या घटका मोजण्यात आली असताना जनआंदोलन उभे झाले. न्यायालयानेही या पर्वतरांगांविषयी चिंता व्यक्त केली, सरकारला जाब विचारला! ती पर्वतरांग पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केल्यास दिल्लीची ढाल आहे. तज्ज्ञांच्या मते या पर्वत रांगेमुळे राजस्थानातील अनेक भाग पूर्णपणे वाळवंट होण्यापासून रोखतात. या टेकड्या मान्सूनच्या वाèयाचा वेग कमी करतात. त्यामुळे पाऊस पडतो. आपण आता अनुभवत असलेले कडक उन्ह, रात्रीचे उष्ण वारे, दिल्लीकडे आलेले वाळूचे वादळ यासोबतही या पर्वतरांगांचा संबंध आहे. ही पर्वतरांग थारच्या वाळवंटातून येणारी धूळ आणि उष्णवारे दिल्लीकडच्या भागात येण्यासाठी थांबवते. जैववैविधतेचे रक्षण करते. येथे विविध औषधी वनस्पती आढळून येतात. एकंदरीत नैसर्गिकदृष्ट्या संपन्न या पर्वतरांगा आता नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. अवैध वृक्षतोड अरावलीत होते आहे. काही भागात बेकायदेशीर खाणकाम व बांधकाम होते आहे. या पर्वतरांगेतून खनिज संपत्तीचे ‘दोहन’ सुरू असल्याने त्या पर्वतरांगा छोट्या छोट्या होत चालल्या आहेत. ऑक्टोबर 2025 च्या अहवालानुसार राजस्थानातील 12 हजार 81 टेकड्यांपैकी 1 हजार 42 टेकड्या (अर्थात पर्वत) 100 मीटरच्या मानांकनाला पूर्ण करते आहे. त्यामुळे न्यायालयाने चिंता व्यक्त करीत समितीची स्थापना करण्याची सूचना केली. 31 ऑगस्ट 2025 मध्ये त्या समितीला आपला अहवाल सादर करावा लागणार आहे. ज्या अरावली पर्वत रांगेने दिल्ली आणि उत्तर भारताचे रेतीच्या वादळापासून संरक्षण केले, तीच आता स्वत:च्या अस्तित्वासाठी धडपडत आहे.
The Great Green Wall and the Death Warrant! ही अरावली पर्वतरांग वाचवण्यासाठी समाजमाध्यमांवर जनआंदोलन सुरू आहे. न्यायालयातही दाद मागितली जात आहे. आंतरराष्ट्रीय वाळू कलाकार अजय रावत यांनी वाळू कलाकृतीतून अरावली पर्वतरांगेचे जनत करण्याचा संदेश दिला आहे. विदर्भात उन्हाचा पारा पुढील वर्षी 50 अंशाच्या घरात जाण्याची घंटी यावर्षी 47.8 अंश सेल्सिअस तापमानाने वाजवली आहे. पुढील वर्षी ते अर्धे शतक पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पर्यावरण दिनापासून पुढील काही महिने वृक्षारोपणाची चळवळ सुरू राहणार आहे. शासन, प्रशासन, सामाजिक संघटनाही सक्रिय सहभाग घेतील. फोटो काढतील, वृत्तपत्रांना फोटो आणि बातम्याही देतील. पण, लावलेली झाडं जगवण्याची जबाबदारी कोणी घेणार आहे का? बेसुमार पाऊस सहन करता येईल. हिवाळ्यात गरम कपडे घालून हिवाळ्याचा आनंद लुटता येईल. पण, उन्हाचे चटके सहन करणे शक्य नाही. ते शेकवल्याशिवाय राहत नाही. अरावली पर्वत रांगेला ‘ग्रेट ग्रीन वॉल’ म्हटले जाते. या ग्रेट ग्रीन वॉलला धक्का लागल्याने तिचा आता ‘डेथ वॉरंट’ निघाला आहे. प्रगतीच्या महामार्गावर धावताना आपण आपल्याच विनाशाचा मार्ग प्रशस्त करतो आहोत. त्या मार्गावर आता हिरवळ निर्माण करत स्वत:च्या मतलबासाठी किमान पर्यावरण शाबूत राखण्याची जबाबदारी आपण स्वीकारू या! पप
9881903765